बाजीरावसाहेब


यम रम नृप शाके रौद्र संवत्सरे मा
धवधवल त्रयोदश्यार्कवारे निशायां।
नृप मुकुटमणी श्री शाहू मुख प्रधानो
सुरपतिमपिद्रष्टुं प्रस्थितो रावबाजी।।



"आम्ही सरकारचे चाकर! जिकडे हुकूम होईल तिकडे जाऊ. स्वामींनी शत्रूची भीती बाळगू नये. आमच्या पुढे मुघलांची तमा काय, काळाच्याही तोंडात जाऊन राज्याचा बंदोबस्त करू. बुंधा तोडला की फांद्या आपोआप गळून पडतील..!"

शार्वरीनाम संवत्सर शके १६४२, चैत्र वद्य सप्तमी, दि. १८ एप्रिल १७२० ह्या दिवशी छत्रपती शाहू राजांच्या दरबारात छत्रपतींचा नवनियुक्त पेशवा महाराजांना स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्याचं वचन आत्मविश्वासाने देत होता. हेच सकलराजकार्य सेनाधुरंधर प्रौढप्रतापचक्रवर्ती श्रीमंत स्वारी राजमंडळ पंतप्रधान थोरले बाजीराव बल्लाळ!!!

त्यावेळी त्यांचं वय अगदी २० वर्षांचं! सौंदर्य!!! सहा फूट उंची, पिळदार शरीर, पाणीदार डोळे, धरधरीत नाक, आणि सोन्यासारखा रंग. सदा प्रफुल्लित राजबिंडा चेहरा! त्यांच्या चालीत शिपाईबाणा जाणवायचा. राज्यकारभारातील कुठलंही काम ते सबुरीनं न घेता लगेच मार्गी लावत. ते अगदी रोखठोक वागत. दिल्लीच्या बादशाहनेही यांचं सौंदर्य फक्त चित्र पाहून, 'ये सुरतपाक नवजवान सैतान है', असे उद्गार स्वस्फूर्तीने काढले होते. असे अगदी आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेले पेशवे गुणग्राहक, विद्याभिलाशी आणि शास्त्राची, वेदांताची आवड असणारे होते. भट घराण्यातील या हिऱ्याने स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर मराठा राज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. पुण्यातील शनिवार वाडाही यांनीच बांधला. त्यांच्या १७२० ते १७४० या अवघ्या वीस वर्षांच्या पेशवेपदाच्या कारकिर्दीत ते २६ लढाया लढले पण त्यातील एकही लढाई हरले नव्हते. 'दौलत म्हणजे राज्यातील माणसे' हे सूत्र थोरल्या महाराज साहेबांनंतर राऊंनाच उमजले होते. राज्यातील लोकांशी अगदी प्रेमाने, आपुलकीने वागत, बोलत. लोकांमध्ये राहून राहून आपल्या पत्रांमध्ये उर्दू व हिंदी भाषाही ते वापरत. त्यांच्या लेखनातून शौर्य आणि रूबाबदारपणा दिसून येई. मोहिमेत रामायण वाचन ते करीत असत. घोड्यावर बसल्या बसल्या सुद्धा पत्रे लिहीत असत. वाचन सुद्धा करत असत. त्यामुळे खोगिरात लेखनसाहित्य आणि एक लहान भगवद्गीतेची पोथी कायम त्यांच्या सोबत असे. आपलं पाहिलं लक्ष त्यांनी दिल्ली मानलं आणि त्या योगाने आपलं सैन्य सतत उत्तरेत फिरतं ठेवलं. चढाई बरोबर लढाई या धोरणाने सगळं सैन्य त्यांनी भारून सोडलं आणि अगदी अशक्य अश्या लांबच्या लांब पल्ले मारत जीवाचं रान करून शत्रूला गाठून, त्याला घेरून, झुंज देऊन विजय प्राप्त करत आणि अशामुळे संपूर्ण हिंदुस्तानात त्यांचा दबदबा वाढला. 

अशा सर्वगुणसंपन्न श्रीमंत राऊस्वामी यांनी स्वामिनिष्ठा आणि शौर्य या जोरावर 'ज्याची तलवार तळपती त्याचं राज्य' हे धोरण अंगिकरून मराठेशाहीत एका वैभवशाली युगाचा प्रारंभ केला. 'गनिमी काव्याचे प्रभू', 'देवयोद्धा' वगैरे अनेक उपाध्या लोकांनी त्यांना दिल्या. इतके कर्तृत्ववान असूनही स्वामी आणि चाकर यांच्यातील अंतर त्यांनी कधीही डावललं नाही. असे शूर, तडफदार कर्तव्यनिष्ठ पेशवे मराठी राज्याला लाभले, हे भाग्यच! रौद्रनाम संवत्सरे वैशाख शुध्द १३, शके १६६२, सोमवार दि. २८ एप्रिल १७४० रोजी मध्यप्रदेशातील रावेरखेडी येथे नर्मदाकाठी श्रीमंत बाजीरावसाहेबांचा मृत्यु झाला.


©- श्रेयस पाटील