वृद्ध स्त्री पुरुषासमान शिशुचे व्हावे मनोरंजन।
वाटे भंजन नास्तिकांस जणू डोळ्यातले अंजन।
साऱ्या दुश्चित वासना करी तसे ज्ञानसिने कीर्तन।
चित्त स्थिर करूनी बळ दे, ते जाण तू कीर्तन।।
भारतभूमीस फार पुरातन काळापासून कीर्तनाची अलौकिक परंपरा लाभली आहे. कीर्तन हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. कीर्तन हे लोकजागृतीचे साधन म्हणून प्राचीन काळापासून प्रचलित आहे. समाजाच्या मनोरंजना सोबतच प्रबोधनाचे, जागृतीचे, त्यांच्या मनात धर्मनिष्ठा, हरिभक्ती, राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचं सामर्थ्य कीर्तनात आहे. म्हणूनच कीर्तन हा प्रकार सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरलेला दिसतो.
कीर्तन हा एक भक्तीचा प्रकार आहे. श्रीमद् भागवतातील नवविधा भक्तीचे वर्णन करणा-या श्लोकात व्यासमुनी म्हणतात,
श्रवणं कीर्तनं विष्णो:स्मरणं पादसेवनम्।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम्।
कीर्तनभक्ती या माध्यमाचा आजपर्यंत सगळ्याच संतांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी अवलंब केलेला आपण पाहतो. त्या माध्यमातून भगवत् भक्तीचा प्रसार सर्वच संतांनी केला आहे. अशा या श्रेष्ठ भक्तीचे माहात्म्य, या कीर्तन परंपरेचे जनक, आद्यकीर्तनकार श्री नारद महर्षि आपल्या भक्तीसूत्रांमध्ये वर्णन करताना म्हणतात,
स कीर्त्यमानः शीघ्रमेवाविर्भवति अनुभावयति च भक्तान्।
पण कीर्तन म्हणजे नक्की काय हो? तर त्याचे वर्णन विनायकबुवा भागवत यांनी आपल्या "कीर्तनाचार्यकम्" या प्रसिद्ध ग्रंथात असे केले आहे की, शब्दरचना, वाक्यरचना इ. वाक्यचातुर्याने शोभविलेली, नवनव्या अर्थाच्या कवितांनी युक्त असलेले, गाण्याच्या तानांनी वाढविलेले, नटविलेले, शोभविलेले जे असेल, त्यात साधुसंतांचे एखादे उपदेशपर पद असुन ते प्रमाणभूत घेऊन त्यावर उपसंहार केलेला असेल ते कीर्तन ! "Worship of the deity by chanting thy praises and reciting thy names is known as Keertan." याचप्रमाणे हिंदू धर्माच्या विविध धर्मग्रंथांमध्येही कीर्तनाच्या सुंदर व्याख्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी श्रीमद् भागवत सांगते,
कीर्तनं मुनिभि: प्रोक्तं हरे: लीला प्रगायनम्।
अशा या प्राचीन कीर्तनपरंपरेचे दर्शन या लेखनातून आपण घेणार आहोत; पण तत्पूर्वी 'वंदू कीर्तनाचार्य नारदा' !
गळ्यात एक वीणा, हातात चिपळ्या आणि मुखी सतत नारायणस्मरण, अशी मूर्ती आपण लहानपणापासूनच टिव्हीवर वगैरे पाहत आलो आहोत. देवर्षी नारद हे पूर्वजन्मी दासीपुत्र होते. महात्म्यांच्या कृपेने त्यांनी भक्तीप्रेम लाभले व पुढील जन्मी ते भगवंतांचे अंशावतार व ब्रह्मदेवांचे मानपुत्र म्हणून जन्माला आले. भगवंताचे सतत नामस्मरण, गुणानुवाद कीर्तन यामुळे ते 'देवर्षी' या पदाला पात्र ठरले. नारदांनीच भारतीय कीर्तन परंपरेचा प्रारंभ केला, असे मानले जाते. भगवंताच्या अनेक लीलांचे कथा स्वरूपात, संगीताची साथ देऊन मांडणी करण्याची पद्धत रूढ करून, त्यांनीच कीर्तनकलेचा पाया रचला. त्यामुळे मोठ्या गौरवाने त्यांना आद्यकीर्तनकर म्हटले जाते. त्यांच्या कीर्तनाचे वर्णन भागवतात केले आहे.
देवदत्तं इमं वीणां स्वरब्रह्म विभूषिताम् ।
मूर्च्छाइत्वां हरिकथां गायमान: विचराम्यहम् ।।
पुरातन काळात जेव्हा वेद, उपनिषदे, पुराणे, वगैरे निर्माण झाली, तेव्हा ऋषी मुनी त्यातील कथांचे, देवाच्या लीलांचे लोकोपदेशासाठी वर्णन करू लागले. महर्षी व्यासांनी 'व्यास'पीठावर बसून पुढे पोथी वा एखादा ग्रंथ ठेऊन त्यावर उपदेश करणे सुरू केले. यातूनच 'प्रवचना'चा जन्म झाला. यालाच 'व्यासकीर्तन' असेही म्हणतात. म्हणून महर्षी व्यास हे प्रवचनांचे जनक होत. देवर्षी नारदमुनींनी याच कथा निरुपणात भर घातली ती संगीत, वाद्ये, पदे इत्यादींची. भगवंतांची कथा सांगत सांगत सोबत श्लोक, पदे, काव्ये नारदमहर्षी सांगत. हेच कीर्तन आणि या पद्धतीला 'नारदीय कीर्तन' असे म्हणतात. नारदमुनींच्या नंतर शुकाचार्य वगैरेंनीही कीर्तनसेवा करण्यास सुरुवात केली. संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगात या सर्व कीर्तनकारांची नावे दिली आहेत.
नारद प्रह्लाद अंबरीष। विनिटला कीर्तनासी।।
व्यास शुक नामदेव। धरिती भाव कीर्तनीं।।
नारद महर्षींनी सुरु केलेल्या या कीर्तनपरंपरेचे पुढे मध्ययुगीन काळात अनेक संतांनी आचरण केलेले आपण पाहतो. महाराष्ट्रात कीर्तन परंपरेचा सर्वात जास्त प्रचार झाला. अनेक नामवंत कीर्तनकार या महाराष्ट्र भूमीत घडले. संतांनी याचे महत्त्व आपल्याला त्यांच्या वाड्मयांमधून पटवून दिले. या संतांमध्ये संत नामदेव यांनी ही कीर्तन परंपरा सर्वात प्रथम महाराष्ट्रात प्रभावीपणे मांडली. 'नामदेव कीर्तन करी । पुढे नाचे पांडुरंग।।' असे त्यांच्या कीर्तनाचे वर्णन जनाबाईंनी एका अभंगात केले आहे. नामदेवांनी महाराष्ट्रात पुन्हा सुरू केलेली कीर्तनपरंपरा आजही अगदी उत्तम रितीने अखंडितपणे चालू आहे. शिवकाळात वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन आणि रामदासी कीर्तन अशा तीन कीर्तनांच्या पद्धती महाराष्ट्रात रूढ झाल्या.
नारदीय कीर्तन हे रामदासी आणि वारकरी कीर्तनाचा मध्यच म्हणायला हवा. वारकरी कीर्तनात मधे कीर्तनकार महाराज, मागे टाळकरी असा ताफा असतो. या कीर्तनाची सुरुवात सांप्रदायिक भजनाने होऊन मग पुढे एखादा अभंग घेऊन त्यावर वेगवेगळी प्रमाणे देऊन निरूपण; आणि मग ते व्यवस्थित समजावे, यासाठी मग दृष्टांत कथा, असा एकूण मुख्य गाभा असतो. नारदीय कीर्तनाची सुरुवात नमनाने होऊन पुढे नामस्मरण मग एक मुख्य अभंग घेऊन पूर्वरंगात त्यावर वेगवेगळे दाखले देऊन निरूपण, त्यानंतर मध्यंतरात भजन आणि मग उत्तररंगात पूर्वरंगात घेतलेल्या अभंगाला साजेसे एक चरित्राख्यान, अशी त्याची बांधणी असते. रामदासी कीर्तनही नारदीय कीर्तनाप्रमाणेच केले जाते, मात्र त्यात अभंग, पदे, श्लोक वगैरे सगळे रामदासी वाङ्मयातील असावे, हा नियम आहे. नारदीय आणि रामदासी कीर्तनात संगीत हा मुख्य गाभा मानला जातो. यांमध्ये आर्या, दिंडी, वगैरे वृत्तांतील रचना प्रामुख्याने गायल्या जातात. कीर्तनाच्या या तिन्ही पद्धती जरी वेगवेगळ्या दिसत असल्या, तरीही त्यांत समाजप्रबोधन आणि भगवद्भक्ती हेच मुख्य सूत्र आहे !
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर हे कीर्तनपरंपरेचे सुद्धा माहेरघरच मानले पाहिजे ! या शहरात सतराव्या शतकापासूनच कीर्तनाची परंपरा आहे. पहिल्यापासूनच रसिक असलेल्या पुण्यातील श्रोत्यांनी कीर्तनाला एक नवी ओळख मिळवून दिली. याच शहरात त्यावर अनेक नवनवीन प्रयोग झाले आणि कीर्तने ही मंदिरापुरते मर्यादित न राहत जागोजागी, गल्लोगल्लीत होऊ लागली. साक्षात तुकोबारायांनी पुण्यातील विठ्ठल मंदिरात कीर्तन केलं आहे. खुद्द शिवाजीराजे या कीर्तनासाठी उपस्थित होते. त्याचा उल्लेख भक्तीविजय ग्रंथात आला आहे. शिवाजी महाराज या कीर्तनाला आल्याची बातमी चाकणच्या सुभेदाराला कळली. मग त्या विठ्ठल मंदिराला पठाणांनी वेढा दिला.
ते दिवसी असें हरिदिनी।
कीर्तन ऐके प्रेमेकरुनी।
तो दोन सहस्त्र पठाण चाकणाहुनी।
अविंधे त्वरित पाठविले।।
हेर ठेविलें होते पाळती।
त्यांनी सांगितले यवनांप्रति।
की पूणियास आला नृपती।
दर्शनासी राती तुकयाचे।।
सर्वजण कीर्तन श्रवणाचा आनंद घेत त्यात तल्लीन झाले होते. अशातच तुकोबांना कुणीतरी येऊन मंदिराला पठाणांनी वेढा घातल्याचे सांगितले.
तुकोबांनी पांडुरंगाचा धावा केला आणि त्याच वेळी त्या पठाणांना शिवाजी महाराजांसारखी कुणी व्यक्ती मंदिरातून बाहेर जात असल्याचे दिसले आणि त्यालाच शिवाजीराजे समजून त्यांनी त्याचा पाठलाग केला. इकडे राजे भुयारी मार्गाने निघूनही गेले, तेही अगदी सुखरूप! अशीच तुकाराम महाराजांची अनेक कीर्तने पुण्यात झाली. कित्येकदा खुद्द शिवाजी महाराज कीर्तनाला उपस्थित असत.
पेशवेकालीन पुण्यात नारदीय आणि रामदासी कीर्तने होत. वारकरी कीर्तनाचे उल्लेख मात्र फारसे सापडत नाहीत. त्यासोबतच गणेशोत्सवात सवाई माधवरावांच्या काळात लळीत झाल्याचा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आढळतो. पुण्यातील एका कीर्तनासंदर्भातला एक उल्लेख एका ठिकाणी आला आहे. तो तपशील जसाच्या तसा पुढे देतो.
'कीर्तनाला कधी कधी श्रीमंतांची स्वारी हजर असे. रु. ४ वा।। १४ फाल्गुन १७१८ देणें गिरधर गोसावी विज्यापुरकर कीर्तन फाल्गुन वा।। ११ बिदागी बद्दल देणें हस्ते खुद्द गोसावी म।। २ खेरीज श्रीमंत स्वारी आली तेव्हा कीर्तनसमयी श्रीमंतांनी देवविले रुपये ५.' अशी बिदागी, मान कीर्तनकरांना दिला जाई. श्रावणात, गणपती उत्सवात श्रीमंतांच्या वाड्यात कीर्तनकारांची सुश्राव्य कीर्तने होत. सन १७७२ साली गणपती उत्सवात पुण्यात एकूण ५३ कीर्तनकारांची कीर्तने झाली होती. या उत्सवाचा शेवट लळिताच्या कीर्तनाने होत असे. पेशवाईच्या शेवटच्या काळात अनेक कलाकारांसह शाहिरांना पुण्यात आश्रय मिळाला. शाहिरी थाट पुण्यात खूप रंगू लागला. अनेक पोवाडे वगैरे काव्ये रचून शाहिरांनी पुण्यात एक वेगळेच वातावरण निर्माण केले. अशातच यातील दोन शाहीर, अनंतफंदी आणि राम जोशी यांनी शाहिरीचा त्याग करून ते कायमस्वरुपी कीर्तनकार झाले. कविवर्य मोरोपंत नावाचा एक हिरा याच दरम्यान नावारूपाला आला. त्यांच्या आर्यांनी एक नवीन क्रांतीच घडवली. कीर्तन आणि पंतांची आर्या हे एक समीकरणच बनले. आर्यांशिवाय कीर्तन पूर्णच होत नसे. राम जोशी हे पंतांना आपल्या गुरुस्थानी मानत. त्यांच्याच पायी डफ फोडून त्यांनी शाहिरी सोडली आणि कीर्तनकाराची वस्त्रे अंगावर घातली. स्वतः खूप चांगले कवी असल्यामुळे त्यांच्या स्वतःच्याच काव्यांचा राम जोश्यांना कीर्तनात फार उपयोग होई. राम जोश्यांचे पुण्यातील पहिले कीर्तन १७९३ साली गोविंदराव बाजी जोशी यांच्या घरी झाले. शेवटचे बाजीराव व त्यांचा दिवाण सदाशिव माणकेश्वर हे दोघे राम जोश्यांच्या कीर्तनावर फिदा होते. सदाशिव माणकेश्वर हाही एक उत्तम कीर्तनकारच होता. सरकारवाड्यात बाजीरावाने राम जोश्यांची कीर्तने आयोजित केली होती. १८०८ साली गोकुळाष्टमीस शुक्रवार वाड्यात त्यांची कीर्तने झाली होती. १७९५ साला दरम्यान अनंतफंदी हे नाव फार प्रसिद्ध झाले पुण्यात. तेही फार नावाजलेले कीर्तनकार म्हणून गणले जात. फंदीबुवा या नावाने ते प्रसिद्ध झाले. उत्तम वक्तृत्व, कीर्तनकारास साजेसा आवाज, कवित्व या गोष्टींमुळे त्यांची एक वेगळीच ओळख होती. स्वतः शेवटच्या बाजीरावाने स्वतःच्या पेशवेपदाच्या आरोहणाची सर्व हकिकत फंदीबुवांना सांगून त्यांच्याकडून 'माधव निधन काव्य' हे काव्य लिहून घेतले .
अन्य कलाकारांप्रमाणे कीर्तनकारांनाही पेशव्यांनी आश्रय दिला. त्यांना मानधन वगैरे देऊन पुण्यात कीर्तने आयोजित केली जात असत. यामुळे पुण्यातील प्रत्येक मंदिरात; अगदी तुळशीबाग राम मंदिर, कसबा गणपती, बेलबाग, खुन्या मुरलीधर, अोंकारेश्वर, निवडुंग्या विठ्ठल मंदिर, पासोड्या विठ्ठल मंदिर, कस्तुरे चौक विठ्ठल मंदिर, अशा अनेक ठिकाणी भरपूर कीर्तने होऊ लागली. उत्सवांमध्येही कीर्तने आयोजित केली जात. ही श्रोतृवर्गासाठी पर्वणीच असायची. रसिक असलेले पुणेकर श्रोते कीर्तनकरांना उत्तम दाद देत, ज्यामुळे कीर्तन जास्तीत जास्त रंगत जाई. तुळशीबागेतील रामाच्या मंदिरातील श्रोत्यांची तर अशी ख्याती होती, की जो कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन करून श्रोत्यांची दाद मिळवेल, त्याला कुठेच मग अडचण नाही. तो पूर्ण तयारीचा कीर्तनकार! पुण्यातील प्रत्येक मारुती मंदिरात हनुमान जयंतीपासून अक्षय्य तृतीयेपर्यंत दररोज नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होत असत आणि अजूनही काही ठिकाणी होत असतात. लक्ष्मणबुवा शिरवळकर, नाना महाराज बडोदेकर, दासगणू महाराज, शंकरशास्री भिलवडीकर, असे अनेक नामवंत नारदीय कीर्तनकार पुण्यात नावारूपाला आले. या सर्व कीर्तनकारांची एक संघटित संस्था असावी, ज्या माध्यमातून कालानुरूप कीर्तनांमध्ये, कीर्तनकार वर्गामध्ये बदल व्हावेत, या उद्देशाने वे.शा.सं.वामनशास्री केमकर यांनी १८०५ साली 'श्रीहरिकीर्तनोत्तेजिनी' या संस्थेची स्थापना केली. परंतु पुढे प्लेगच्या दुर्दैवी आघातामुळे अनेक उत्साही कार्यकर्त्यांचे बळी गेले. त्यामुळे ही संस्था काही काळ बंद पडली. या नंतर दर संकष्ट चतुर्थीला गुपचुप गणपती मंदिरात कीर्तने होऊ लागली. पुढे १८२० साली विजयादशमीच्या सुमुहूर्तावर जुन्याच संस्थेची पुनर्निर्मिती करून 'श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा' या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेमार्फत बुधवार पेठेत बालाजी मंदिरात कीर्तने आयोजित केली जात. पुढे ती रामेश्वर मंदिरात होऊ लागली.
बदलत्या सामाजिक परिस्थितीला अनुरूप अनेक बदल तेव्हापासूनच कीर्तनात सुरू झाले. लोकमान्य टिळकांनी कीर्तनाचे समाजप्रबोधनातील महत्वाचे स्थान जाणून डॉ.पटवर्धनबुवा यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घातली आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीसाठी ऐतिहासिक, क्रांतिकारक इत्यादी चरित्रे आख्यानात सांगितली जावीत, अशी इच्छा व्यक्त केली. पटवर्धन बुवांनी त्यानंतर आपला डॉक्टरी पेशा सोडून शिवछत्रपती, बाजीप्रभु देशपांडे, अफजलखान वध, अशी एकूण १९४ आख्याने तयार केली आणि ती आख्याने पुण्यात होऊ लागली. कीर्तनपरंपरेच्या शास्त्रात बसत नसली, तरी श्रोतृवर्गाला ही नवीन आख्याने पौराणिक आख्यानांपेक्षा जास्त आवडू लागली. यातूनच स्वदेशप्रेमाची जाणीव लोकांना करून देण्यात येऊ लागली. तरुण वर्ग या कीर्तनांकडे प्रचंड प्रमाणात आकर्षित झाला. लोकमान्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि यातूनच 'राष्ट्रीय कीर्तन' या आधुनिक प्रकाराचा जन्म झाला.
काळानुरूप बदल घडवत आजही नारदांनी सुरू केलेली ही कीर्तनपरंपरा तितकीच लोकप्रिय आणि क्रियाशील आहे. आजही सामाजिक प्रबोधन करण्याचे, राष्ट्रप्रेमाची ज्योत मनामनात पेटविण्याचे, धर्मप्रेमाचा अंगार फुलविण्याचे कार्य ही कीर्तनपरंपरा करत आहे. शेकडो कीर्तनकार पुण्यनगरीत तयार झाले. पूर्वी केवळ मंदिरांमध्ये होणारी कीर्तने आता सर्वत्र, सभागृहांमध्ये, शाळांमध्येही होऊ लागली आहेत. तरुण श्रोते वाढले, तसेच उच्चशिक्षित युवा कीर्तनकारही आता तयार होऊ लागले आहेत. अनेक भाषांमध्ये, अनेक प्रकारांमध्ये, अगदी शैक्षणिक महत्त्व पाठवून देण्यासाठीही कीर्तने होत आहेत. पूर्वीपासून चालत आलेली कीर्तने अजुनही उत्साहाने आयोजित केली जातात. अर्थात् हे सर्व प्रकार मूळच्या कीर्तनपरंपरेला धरून नाहीत, हेही नमूद करणे महत्त्वाचे आहे. मूळ कीर्तन परंपरा ही केवळ भगवद्गुण-कीर्तनावरच उभारली गेली होती व म्हणूनच ते भक्तीचे महत्त्वाचे साधन होते.
या कीर्तनभक्तीचे श्रेष्ठत्व कसे सांगावे ? शब्दच नाहीत ! मात्र आपल्या संतांनी कीर्तनभक्तीची सुंदर फलश्रुती सांगितली आहे. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
कीर्तनें माहां दोष जाती।
कीर्तनें होये उत्तमगती।
कीर्तनें भगवत्प्राप्ती।
येदर्थीं संदेह नाहीं।।
कीर्तनें वाचा पवित्र।
कीर्तनें होये सत्पात्र।
हरिकीर्तनें प्राणीमात्र।
सुसिळ होती।।
कीर्तनें अवेग्रता घडे।
कीर्तनें निश्चय सांपडे।
कीर्तनें संदेह बुडे।
श्रोतयां वक्तयांचा।।
आजच्या या देवर्षी श्री नारदांच्या जयंतीदिनी, हजारो वर्षे ही रंजक- मनोरंजक व भगवद्भक्तीवर्धक अद्भुत कीर्तनपरंपरा सजीवित व नित्यवर्धिष्णू ठेवणा-या ज्ञात-अज्ञात प्रतिनारदरूप सर्व कीर्तनकारांच्या चरणीं कृतज्ञतापूर्वक दंडवत घालून कीर्तनपरंपरेचे माहात्म्य सांगून कीर्तनपरंपरेच्या इतिहासावर अल्पसा प्रकाश टाकणारे माझे हे मनोगत श्री नारदाचार्य चरणीं प्रेमभावे निवेदित करतो !
© - श्रेयस पाटील