भावें ध्यातो प्राकृतकाव्याचार्या मयुरकविराया।
अप्रतिभा जेंवि घना निजतापतती मयूरक विराया।।
महाराष्ट्र भुमिस फार पुर्वीपासुनच संत महात्म्यांचा, अजिंक्य योध्यांचा दैदिप्यमान इतिहास लाभला आहे. यांसोबतच रघुनाथ पंडीत, वामन पंडीत यांच्यासारखे कवीही लाभले. यांच्यातच पेशवाईत एक असाच अनोखा हिरा या महाराष्ट्राला लाभला. कविवर्य मोरोपंत अर्थात मयूर पंडीत!! आर्या, केकावली यांसारखी एक नवी काव्यशैली त्यांनी महाराष्ट्रासह संपुर्ण देशास दिली. एकुण एक लक्ष आर्या त्यांनी रचल्या. रामायणाचे १०८ विविध प्रकार तर प्रसिद्ध आहेत. मराठी साहित्यात पंतांच्या काव्यांनी खुप मोठी भर घातली आहे. सारस्वतांसाठी खजिनाच हा!! महाराष्ट्र भुमीतील या अनोख्या हिऱ्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न पुढे करत आहे.
१७०० ते १७१५ या पंधरा वर्षांच्या कालावधीत कोकणातुन भट, भानु, पटवर्धन, जोशी, पाध्ये आणि पराडकर अशी सहा कुटुंबे देशावर आली. भट, भानु, पटवर्धन आणि जोशी यांनी देशसेवेचे व्रत अंगीकारले आणि शाहु महाराज यांच्याकडे ते दाखल झाले. त्याच वेळी पाध्ये आणि पराडकर ही कुटुंबे स्वधर्म आणि स्वभाषेच्या सेवेसाठी पन्हाळगडावर स्थायिक झाली. पराडकर, कऱ्हाडे ब्राह्मण घराणे, हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील सौन्दळ या गावचे रहिवासी. त्यांचं कुलदैवत सोलापूर जिल्ह्यातील सोनारी येथील काळभैरवनाथ होते. या कुटुंबातील रामचंद्रपंत पराडकर हे पुढे इतर पाच कुटुंबासमवेत देशावर आले आणि पाध्ये यांच्यासोबत पन्हाळगडावर स्थायिक झाले. त्यांच्या पत्नीच्या पोटी चार अपत्य त्यांना लाभली. तीन मुले आणि एक मुलगी. या तीन मुलांमधले तिसरे मोरोपंत! त्यांचा जन्म १७२९ साली पन्हाळगडावरच झाला. सुरुवातीचे शिक्षण त्यांचे तिथेच झाले. त्यांना चार गुरू होते. पहिले गुरू स्वतः त्यांचे वडील रामाजीपंत, केशव आणि गणेश ही पाध्ये मंडळी आणि हरि. या हरींबद्दल जास्त माहिती मला मिळाली नाही. पण केशव आणि गणेश हे धर्मशास्त्र, काव्य, मीमांसा शास्त्र आणि न्यायशास्रात पारंगत होते. त्यांच्या घराण्यातील बाबा पाध्ये यांनी सुप्रसिद्ध 'धर्मसिंधु' या ग्रंथाची निर्मिती केली. असे चार गुरू मोरोपंतांना लाभले. आपल्या गुरुंबद्दल, म्हणजेच पाध्ये बंधुंबद्दल महाभारताच्या शेवटी पंत म्हणतात,
श्रीमदुपाध्यायात्तम कविवर केशव गणेश पादरजां।
धरुनि शिरी हे सद्यश लिहिले पीताति साधू सादर ज्या।।
श्रीमंत बाबूजी नाईक बारामतीकर, पेशवाईतील एक व्यक्तिविशेष! कारस्थानी माणुस म्हणुन इतिहासात नावाजलेली व्यक्ती! १७५६ साली श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या सांगण्यावरून ते रघुनाथराव दादा यांच्यासोबत उत्तरेत मोहिमेत गेले. पण आपल्या स्वभावामुळे त्यांचे आणि राघोबादादांचे पटले नाही आणि मोहीम अर्ध्यात सोडुन ते बारामतीस निघुन आले. याच दरम्यान मोरोपंत बारामतीत त्यांच्या दरबारात आले. मोरोपंतांचे काव्य रचनांनी त्यांचे मन जिंकले आणि आपल्या वाड्यावरच बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना आश्रय दिला. मोरोपंतांच्या काव्य रचनेला प्रोत्साहन म्हणुन त्यांना आपले पुराणिक केले आणि त्यांची उत्तम बडदास्त वाड्यावर ठेवली. तेव्हापासुन, म्हणजे १७५६ सालापासून मोरोपंत बारामतीकर झाले! पंतांचंही आपल्या यजमानांवर प्रेम होते, आपलेपणा होता. त्यांनाही पंतांबद्दल खुप अभिमान होता. बाबुजींबद्दल पंत एका ठिकाणी आवर्जुन लिहितात,
श्रीमत्सदाशिवात्मज बाबूजी नायक प्रभू ज्ञानी।
धन्य म्हणावें ज्याला शुद्धगुणश्रवणतृप्त सुज्ञांनी।।
श्रीबाबूराय प्रभु माझा अत्यंत सदय अन्नद हा।
अर्थिजना न म्हणो दें जैसा तप्तास जेवीं सन्नद हा।।
बाबुजी नाईकांचे धाकटे पुत्र पांडुरंगराय हेही पंतांच्या काव्याचे चाहते होते. बारामतीकरही पंतांना फार मानत, फार प्रेम करत. पंतांनीही बारामतीचा गौरव 'क्षेत्रे सिद्धेश्वरस्य प्रथितपृथुगुणें मूर्त कैलासरुपे' अशा शब्दात केला आहे. नायकांनी आपल्या वाड्या शेजारीच दक्षिणेला एक वाडा पंतांच्या कुटुंबियांसाठी राहण्यास दिला. पंत या वाड्यात राहु लागले. पंतांचा सहवास ४० वर्षे बारामतकरांना लाभला. संपुर्ण बारामती पंतांच्या आर्यांच्या सागरामध्ये डुंबुन गेली. एका आर्येत म्हटलं आहे,
आर्या! तरुच्या पक्षा त्यागा बारामती तमोराशी।
आर्यातरुच्या पक्षा त्या गा बारामतीत मोराशी।।
मोरोपंतांनी बारामतीत आल्यावर अनेक रचना केल्या. त्यांचं श्री रामचंद्र हे उपास्य दैवत! त्यामुळे त्यांनी आयुष्यात १०८ काव्यात्मक रामायण रचण्याचा संकल्प सोडला. त्याची अशी आख्यायिका सांगितली जाते की, अहमदनगरचा एक वृद्ध होता. त्याचे वय साधारण शंभरी गाठलेले होते. तोही रामाचा निस्सीम भक्त होता. त्याच्याकडे रामरायाची अत्यंत देखणी मूर्ती होती. वय झाल्यावर त्याला रामरायाने दृष्टांत देऊन सांगितले की, 'तुझ्यानंतर या मुर्ती तु बारामतीस जाऊन मोरोपंत या नावाच्या माझ्या भक्ताला दे.' त्यानुसार तो वृद्ध आपले नित्य सोवळे पाळत त्या मुर्ती घेऊन अनवाणी बारामतीस चालत आला आणि त्याने मोरोपंतांना ते श्रीराम पंचायतन सुपुर्द केले. आपल्या आजवरच्या सेवेचा हे फलित म्हणुन साक्षात रामरायाने हा प्रसाद आपल्यासाठी दिला, असे वाटुन मोरोपंत भारावुन गेले आणि त्यांनी १०८ रामायण काव्याचा संकल्प सोडला. एक उदाहरण म्हणुन पहायचं तर या रामायणांमध्ये एक निरोष्ठ रामायण म्हणुन अगदी १४ १५ आर्यांचे रामायण त्यांनी रचले. या संपुर्ण रामायणात प, फ, ब, भ आणि म ही अक्षरेच येत नाही आणि त्यामुळे 'राम' हा शब्दच त्या काव्यात नाही! ही सर्व अक्षरे ओष्ठय अक्षरे म्हणुन आपण ओळखतो आणि ती नसलेले रामायण काव्य म्हणुन त्याला त्यांनी 'निरोष्ठय' रामायण हे नाव दिले. काही रामायण काव्ये अशी आहेत की ज्यात फक्त १३ ओळी आहेत. काहीं मधले प्रत्येक ओळींचे पहिले अक्षर घेतले तर ते 'श्रीराम जय राम जय जय राम' असे होते. काहींचे शेवटली अक्षरे 'श्रीराम जय राम जय जय राम' होतात. अजुन एक तर असे आहे की त्यातलं पहिल्या ओळीचं पहिलं अक्षर श्री, दुसऱ्या ओळीचं दुसर अक्षर रा, तिसऱ्या ओळीचं तिसरं अक्षर म, असं श्रीराम जय राम जय जय राम तयार होई. तेही आर्या वृत्ताचे नियम पाळून!! काय शब्द भांडार असेल!! उदाहरणांसह पाहूयात अजुन काही? चला!!
दोन उदाहरणे पाहुयात. पहिले, नामांक रामायण! यातील प्रत्येक अोवीतील पहिल्या अोळीचे पहिले अक्षर 'रा'; तर दुसऱ्या अोळीचे पहिले अक्षर 'म', असे एकशे एकोणतीस आर्यांचे रामायण पंतांनी रचले. पहा-
'रा'ईचा गिरी, गिरीची राई करी, त्या दशास्य तो काय?।
'म'हिमा अरिसही देतो ज्याच्या हृदयात आपुलें पाय।
'रा'ष्ट्रचि न, राम विनवी देऊनि धर्मार्थकाम मोक्ष मही।
'म'त अनुसरे प्रजांचे अक्षमसा, रामराज तो क्षमही।।
दुसरे उदाहरण, मंत्रमयरामायण! या आर्येत त्रयोदशाक्षरी मंत्र पंतांनी प्रत्येक आर्येत घातला आहे! शब्दांवर काय प्रभुत्व असेल पहा-
'श्री'मान 'रा'ज शिरो'म'णी दशरथ, नि'जय'शें ब'रा' 'म'हीत।द्वि'ज' सेवक, 'य'ज्ञनिरत, 'ज'नभ'य' हर्ता, ध'रा'निका'म'हित।।
अजुन एक आर्या उदाहरण म्हणुन पाहु.. ही आर्या कीर्तनकार मंडळी आपल्या कीर्तनात गातात. तसं पाहिलं तर मोरोपंतांच्या काळापासूनच आजपर्यंत मोरोपंतांच्या आर्यांचा सर्वात जास्त प्रचार प्रसार जर कुठल्या माध्यमातुन झाला असेल, तर ते म्हणजे कीर्तन!! रहिमतपुरकर बुवा, आत्मारामबुवा फलटणकर, नागेशकवी वगैरे कित्ती नावे घ्यावी! पंतांचेच मित्र राम बडवे, हे स्वतः उत्तम कीर्तनकार होते. ते म्हणतात,
सुस्वरकंठे रसिकें आर्या गाता मयूरबाबाची।
वेधी सुजनमनाते न तशी धुन ऐकता रबाबाची।।
आजही कीर्तनात तुम्हाला आर्या नक्की ऐकायला भेटेल. मग ते कीर्तन जर आफळे बुवा किंवा घाग बुवांचं असेल तर मग काय! काटा!! अशीच एक मोरोपंतांची आर्या मारुतीराया संबंधित! या आर्येची शेवटची सात अक्षरे पहा. दोन्ही ओळींमध्ये सारखीच, मात्र अश्या ठिकाणी शब्दांची फोड मोरोपंतांनी केलीये की वाक्याचा अर्थ बदलतो.
गगनात लक्ष गेले, केले उड्डाण 'जनन समयास'।
उपमा काय वदावी, या ब्रह्माण्डात, 'जन न सम यास'।।
कविता आणि ओवी मोरोपंतांना फार जवळच्या वाटत. त्यामुळे त्यांनी दोन्ही एकत्र करून ओवीमय आर्या नावानी चौदा आर्यांची रचना केली. एकत्रीकरण कसे? पाहूया..
ओवी:
सिताकांत मेघश्यामा हा दीन दास लक्षावा, रामा।
अनुदिन वदनी, नामा वसवुनी नित्य रक्षावा।।
आर्या:
सिताकांत, मेघश्यामा, हा दीन दास लक्षावा।
रामा अनुदिन वदनी, नामा वसवुनी नित्य रक्षावा।।
मराठी साहित्यास पेशवाईच्या काळात हा असा एक अनमोल हिरा लाभला आणि तत्कालीन राजा महाराजांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. आर्य भारत, मंत्र भागवत, कृष्णविजय, हरिविजय, सतीगित, संशय रत्नमाला, केकावली, आर्याकेकावली, अशी अनेक मराठी काव्य रचना त्यांनी मराठी साहित्यास दिल्या आणि ते इतिहासात अजरामर झाले. पंतांच्या आर्यांचा इतका प्रचार विविध माध्यमातून त्या काळी झाला, की ते सर्वांचे 'कविवर्य', 'मयूर पंडीत' झाले! आर्यांवरच्या आपल्या प्रभुत्वाविषयी मोरोपंत अभिमानाने म्हणतात,
प्रकटी प्रथम भगीरथनृप लोकीं सुरनदिस ती आर्या।
तशी हे 'मयूर' नाही तरी सर्वांसी न दिसती आर्या।।
केकावली त्यांची आयुष्यातील शेवटची रचना! याची रचना १७९३- ९४ साली झाली. या केकावलीत पंत रामरायाला मागतात-
दयामृतघना ! अहो हरि ! वळा मयूराकडे,
रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे।
असा अतिथि धार्मिकस्तुतपदा कदा ! सापडे ?
तुह्मा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे।।
खरंच! रामरायाने आपल्या या निस्सीम भक्ताची हाक ऐकलीच म्हणावें लागेल. कारण पुढे चैत्र मास उगवला. पंतांकडे त्यांच्या वाड्यात रामनवमी फार धुमधडाक्यात साजरी होत. असाच याही वर्षी नऊ दिवस भजन, कीर्तन, पुराणश्रवण, उपासना वगैरे कार्यक्रमांची उत्सवात रेलचेल होती. रामनवमी झाली. दशमीचे पारणे झाले आणि अचानकच एकादशीस पंतांना ताप चढला. दिवसेंदिवस तो वाढत गेला. आपले कार्य संपले असल्याची जाणीव पंतांना झाली. पंतांनी सर्व आप्तेष्टांना बोलावुन घेतले. त्यांना अखेरचा निरोप सांगितला. त्यानंतर चतुर्दशीस पंतांनी 'प्रांतप्रार्थना' नावाचे अगदी शेवटचे काव्य रचले. त्यात त्यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. अत्यंत हृदयद्रावक असे हे काव्य पाहुन कुणाही व्यक्तीच्या डोळयातून पाणी यावें! पंत म्हणतात-
दुग्धादी स्वरसे बहु पोषण केले, सदैव, गाई हो,
गोमय दानें अंती मज दीना उद्धराची आई हो!
विश्वंभरे! क्षमे! तू देऊनि शयनार्थ दर्भ, कामातें,
या पुरवुनिया अंती देवी! करी धन्य अर्भका मातें!
मातें तुळसी! असो तव दळ वदनीं, मुळमृत्तिका भाळी,
प्राणावसान समयीं, इतुकीच दया करुनी सांभाळी!
अंती हें आस्य वसिव, जेवीं दशरथास्य रामनामा तें,
त्वत्कामनाची वाढो, न स्पर्शो अन्य कामना मातें!
भगवज्जन हो! वंदुनी पदर पसरितो, असोचि द्या स्मरण,
तरण तसे मज पाजा, श्रीहरिहर नामें, पातल्या मरण!
मोहाया न करावा प्रांजली जो मी 'मयुर' या तजर,
आप्त मुदीत हो! सुखवा हरिनामाचा करुनिया गजर!
अशा एकुण सतरा आर्यांमध्ये पंतांनी सर्वांचे आभार मानले. माझ्या मृत्युनंतर देहा जवळ कुणीही रडारड करू नये, फक्त रामनामाचा गजर करावा. माझ्या देहावर अग्निसंस्कार करुन माझ्या अस्थी गंगेत सोडाव्यात इत्यादी सुचना पंतांनी केल्या. दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती! इकडे रामरायाच्या परमप्रिय भक्ताचा जन्मकाल सर्वत्र सुर्योदयी साजरी होत असतानाच इकडे हा रामभक्त रामरूपी लीन झाला. काय भाग्य हो! पंतांच्या रामभक्तीची ही पावतीच!!
पेशवाईत या महाराष्ट्रास लाभलेले हे एक अमुल्य रत्न! यांच्या अगदी कमी कविता आज प्रसिद्ध आहेत. आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांचे काव्य जास्तीत जास्त लवकर सर्वांसाठी सहज उपलब्ध होवो, इतकीच मारुतीरायाच्या, रामरायाच्या चरणी प्रार्थना करूया आणि लेखास पंतांचं स्मरण करीत पुर्णविराम देऊया!!
मोरेश्वर पंताची ऐकुनी कविता मनीं सुकवीं लाजे।
पावें विवर्णितां, तें मी किती वर्णू जनीं सुकवीं लाजे।।
- © श्रेयस पाटील