परचक्र निरूपण


समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्या तीर्थाटनाच्या काळात हिंदुस्तानातील लोकांची चाललेली छळवणूक, दुष्काळामुळे होणारी होरपळ हे सगळं अगदी जवळुन पाहीलं. उपासमार, बलात्कार, हिंदु देवदेवतांच्या मंदिरांचे हाल, मुर्तींची विटंबना हे सगळे म्लेंच्छांचे धंदे समर्थांनी त्या दरम्यान पाहीले. ह्या सर्व वाईट परिस्थितीचे वर्णन समर्थांनी 'अस्मानी सुलतानी' आणि 'परचक्र निरूपण' या दोन स्फुट प्रकरणांमध्ये केलं आहे.

'परचक्र निरूपण' हे स्फुट प्रकरण श्री. प्रशांत सबनीस यांनी टाकळी मठातील बाडातून संकलीत केले आहे. एकुण ४१ अोव्यांपैकी २८ ते ४१ या १४ अोव्या उपलब्ध आहेत. बाकी १ ते २७ या अोव्या अनुपलब्ध आहेत. उपलब्ध १४ अोव्या पुढे दिल्या आहेत.


पदार्थमात्र तितुका गेला। नुसता देशचि उरला।
येणेकरिता बहुतांला। संकट जालें।।२८।।

लोके स्थान भ्रष्ट जालीं। कितेक येथेचि मेली।
उरली तें मराया आली। गांवावरी।।२९।।

काही रेडे पाडे उरलें। तें लोक गांवावरी आलें।
+ रगा करिता मरोनि गेलें। रेडे पाडे।।३०।।

माणसां खावया धान्य नाहीं। अंथरुण पांघरूण तेही नाहीं।
घर कराया सामग्री नाहीं। काये करिती।।३१।।

पुढें आला पर्जन्यकाळ। धान्य महर्ग दुःकाळ।
शाकार नाही भळभळ। रिचवे पाणी।।३२।।

कितेक अनाचारी पडिली। कितेक यातिभ्रष्ट जालीं।
कितेक तें आक्रंदली। मुलें बाळें।।३३।।

कितेक विषे घेतली। कितेक जळीं बुडाली।
जाळिली ना पुरिली। किती येक।।३४।।

ऐसें जालें वर्तमान। पुढेचि अवघ्या अनमान।
सदा दुश्चित अवघें जन। उद्वेगरुपी।।३५।।

अदयापी दुश्चिन्हें दिसती। दुष्ट ग्रह आडळती।
पुढेही वाईट सांगती। किती येक।।३६।।

काहींच पाहतां धड नाहीं। विचार सुचेना काहीं।
अखंड चिंतेचा प्रवाही। पडिलें लोक।।३७।।

येक म्हणती कोठें जावें। येक म्हणती कायें करावें।
विदेशा जाऊनि कायें खावें। वेच नाहीं।।३८।।

तथापि मार्गचि चालेना। भिक्षां मागता मिळेना।
अवघें भिकारीच जना। कायें म्हणावें।।३९।।

प्राणीमात्र जालें दुःखी। पाहाता कोणी नाहीं सुखीं।
कठीणकाळी ओळखीं। धरींनात कोण्ही।।४०।।

लोक बहुत प्रस्तावले। कितीयेक जाजावले।
कितीयेक तें कावले। उद्वेगरुपी।।४१।।

।।इति परचक्र निरूपण नाम समास।।

।।जय जय रघुवीर समर्थ।।