श्री समर्थकृत अस्मानी सुलतानी - २


प्रबंध दुसरा -


जन बुडाले बुडाले पोटेविण गेलें।
बहु कष्टले कष्टले कितीयेक मेले।
वीसा लोकांत लोकांत येकचि राहिले।
तेणें उदंड उदंड दुःख चि साहिले।।धृo।।

काही मिळेना मिळेना मिळेना खायाला।
ठाव नाही रें नाही रें नाही रें जायाला।
हौस कैंची रे कैची रें कैची रें गायाला।
कोठें जावें रें जावें रें जावें रें मागायाला।।१।।

शेत पिकेना पिकेना पिकेना उदंड।
कष्ट करुनी करुनी होत आहे भंड।
अवघें जाहाले जाहाले जाहाले थोतांड।
दुनिया पाहाता पाहाता उदंड जालीं लंड।।२।।

देश नासला नासला उठे तोचि कुटी।
पिके होताची होताची होते लुटालुटी।
काळाकरिता जिवलगा जालीं तुटातुटी।
अवघ्या कुटुंबा कुटुंबा होते फुटाफुटी।।३।।

कैचा आधार आधार नाही सौदागर।
काही चालेना चालेना उदीम व्यापार।
सर्व सारिखे सारिखे जाला येकंकार।
काळ कठीण कठीण कैसा पावें पार।।४।।

नलगे हासावें हासावें सगट सारिखेचि।
लोक तुटले तुटले संसाराची ची ची।
जनीं इजती हुरमती पाहो जाता कैची।
दुनिया जालीं रे जालीं रे जालीं रे बळाची।।५।।

धान्ये माहाग माहाग जैसे ही मिळेना।
कैसें होईल होईल होईल कळेना।
काये होणार होणार होणार टळेना।
पुण्य गेले रें गेले रें काहींच फळेना।।६।।

पाऊस पडतो पडतो उदंड पडतो।
नाहीतरी उघडे उघडे अवघा उघडतो।
पीळ पेचाचा पेचाचा प्रसंग घडतो।
लोक उधवेना उधवेना औघा च दडतो।।७।।

सुडके पटकर पटकर न मिळे पांघराया।
शक्ति नाही रें नाही रें कोंपट कराया।
वाट फुटेना फुटेना विदेसि भराया।
अवघी बैसलों बैसलों बैसलों मराया।।८।।

बायेला लेकुरें लेकुरें सांडोनिया जाती।
भीक मागती मागती तिकडेची मरती।
रांडा पोरांच्या पोरांच्या तारांबळी होती।
मोल मजुरी भिकारी होऊनि वाचती।।९।।

बरें होईल होईल लागलीसे आस।
बरें होईना होईना आसेची निरास।
काळ आला रें आला रें जाहाले उदास।
काही केल्यानें केल्यानें मिळेना पोटास।।१०।।

नदी भरता भरता घालुनिया घेती।
वीखं घेऊनी घेऊनी उदंड मरती।
अग्नि लाऊनी लाऊनी जळोनिया जाती।
मोठी फजिती फजिती सांगावें तें किती।।११।।

येक पळाले पळाले दुरी देशा गेले।
बहु कष्टले कष्टले तेथे नागवले।
फिरोनी आलें रें आलें रें घरीच लोक मेले।
कोठें उपाय दिसेना कासाविस जालें।।१२।।

उदंड चाकरी चाकरी मिळेना भाकरी।
लोक निलंड निलंड काढोनि नेती पोरी।
न्यायें बुडाला बुडाला जाहाली सिर्जोरी।
पैक्या कारणे कारणे होतें मारामारी।।१३।।

कोण्ही वाचला वाचला तो सवेंचि नागवला।
उदीमा गेला रें गेला रें तो मध्येंचि मारिला।
काही कळेना कळेना कोणाचें कोणाला।
येतो येकाकी येकाकी अकस्मात घाला।।१४।।

येतों पाहुणा पाहुणा लौकरी जाईना।
अन्न खातो रें खातो रें थोडें ही खाईना।
उदंड वाढिलें वाढिलें तर्ही तो धाईना।
गर्वे बोलतो बोलतो कोठें चि माईंना।।१५।।

लोक झीजले झीजले झडेसीच आलें।
दारी बैसले बैसले उठेनासे जालें।
ईरे नाही रें नाही रें बुद्धीने सांडिलें।
अन्ना कारणे कारणे उदंड धादावले।।१६।।

लोक खाती रे खाती रे तेथेचि हागती।
राती उठती उठती भडाभडा वोकीती।
उदंड घेतले घेतले अखंड उचक्या देती।
कर्पट ढेकरें ढेकरें राऊत सोडिती।।१७।।

राहे वस्तीस वस्तीस चोरीतो वस्तांस।
खोटा अभ्यास अभ्यास हाणी महत्वास।
परी तो सांडेना सांडेना ठकीतो लोकांस।
पुढें ठके रें ठके रें ठके अवेवास।।१८।।

लोक भलेंसें दीसती खेटरे चोरीती।
वस्त्रें धोतरे पातरे लपउनी पळती।
कोठे धरिती मारिती महत्वा हारीती।
काये करिती करिती वायेट संगती।।१९।।

दास म्हणे रें भगवंता किती पहासी सत्त्व।
काय वाचोनी वाचोनी ने परते जिवीत्व।
किती धरावें धरावें धरावें ते सत्व।
जालीं शरीरे शरीरे शरीरे निसत्व।।२०।।