दास अंकित रामापायी


'श्रीसद्गुरुवर्य श्रीसकलतीर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामी' असा आपल्या पत्रात ज्यांचा उल्लेख छत्रपती शिवाजीराजे करतात, त्या राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामी महाराज यांची आज पुण्यतिथी! गुरुशिष्य तर ते होतेच. पण ते नातं ते किती जपत होते, समर्थांचं आपल्या या शिष्यवर असलेलं प्रेम, शिवाजीराजांची आपल्या सद्गुरूंवर असलेली निष्ठा, भक्ती, हेही खुप पाहण्यासारखं आहे. एक लक्ष देण्या जोगी गोष्ट पहा! शिवाजीराजांचं निधन १६०२ च्या चैत्रात पौर्णिमेस झालं. चैत्र पौर्णिमा अर्थात 'हनुमान जयंती'! 

आयुष्य त्यांनी स्वराज्य निर्मितीत वाहुन दिलं होतं. समर्थांच्या स्वप्नातलं 'आनंदवनभुवन' च जणु या शिष्याने निर्माण केलं. या लाडक्या शिष्याच्या मृत्युची बातमी समर्थांना काही दिवसांनी कळली. समर्थांना फार दुःख झालं. तेव्हा पासुन समर्थांनी अन्नाचा त्याग केला. फिरणे जवळ जवळ सोडुनच दिले. एका खोलीत सतत बसुन असत. दिवसभरात फक्त दुध! उद्धवस्वामी म्हणतात की, समर्थांचा अवतार हा राजांकरीताच होता. राजे गेले म्हणजे समर्थही लवकरच इहलोकीची यात्रा संपवणार! पुढे छत्रपती संभाजीराजांच्या राज्याभिषेकासही समर्थ स्वतः गेले नाहीत. अंगात अशक्तपणा वाढतंच होता. 

पुढे १६०३ साली, दुर्मुखनाम संवत्सरी समर्थ रामनवमी उत्सवाकरिता चाफळास गेले. हि त्यांची चाफळास शेवटची फेरी. हनुमान जयंती उत्सवही समर्थांनी चाफळमध्येच केला आणि ते पुढे उत्सव झाल्यावर पुन्हा सज्जनगडावर जाण्यास निघाले. जाण्यापुर्वी शिवाजीराजांनी अर्पण केलेल्या होन व जडजवाहिरांमधून रामरायाचं देवालय व दीपमाळ बांधण्याची परवानगी समर्थांनी शिष्य व कारभाऱ्यांना दिली. चाफळच्या रामरायाचं शेवटचं दर्शन घेऊन समर्थ गडावर आले. गडावर आल्यावर शिवाजीराजांनी बांधलेल्या वाड्यात ते राहु लागले आणि त्यांनी बाहेर जाणे पुर्णपणे बंद केले. मार्गशीर्षात कल्याणस्वामी डोमगावहून समर्थभेटीस आले. येताना दासबोधही सोबत आणला होता. तेव्हा समर्थांनी तो दासबोध पुर्ण तपासुन विसाव्या दशकाला पूर्ण केले. पुढे काही दिवसांनी समर्थांनी कल्याणास माघारी जाण्याची आज्ञा केली आणि कल्याणस्वामी पुन्हा डोमगावी निघुन गेले. ही समर्थांची आणि त्यांच्या सगळ्यात आवडत्या शिष्याची, सर्वात लाडक्या शिष्याची शेवटची भेट! 

१६०३ सालचा माघ महिना आला! समर्थांची प्रकृती फारच अशक्त झाली. दिवसेंदिवस अशक्तपणा वाढतंच चालला होता. समर्थ एकाच खोलीत शांत बसुन असत. खोलीत बोलावल्याशिवाय कुणालाही आत सोडु नका, असे समर्थांनी आक्कास्वामी आणि उद्धवस्वामींना सांगितले. ते दोघेच काय ते आत सेवेसाठी असत. समर्थांची प्रकृती दिवसेंदिवस अशक्त होत चाललेली पाहुन शिष्यांनी त्यांना चाफळास राहण्यास जाऊ, गडापेक्षा तिथले हवामान मानवेल, म्हणुन विनंती केली. पण समर्थांनी नाही म्हणुन सांगितले. आपण तिथे गेलो तर शिष्य आपली समाधी तिथे बांधतील आणि रामाच्या सेवेत कमतरता येईल, याची समर्थांना चिंता होती. या देहाला काय व्हायचे ते इथेच घडु दे म्हणत समर्थांनी त्यांना नाही म्हणुन सांगितले. 

जेथे होईल हो प्रांत। तेथे भजतील हो भक्त।
उत्सव चाफळी बहुत। राहील तेव्हा।।
म्हणुनी सज्जनगडी वास। आम्हांस करणे सावकाश।
जे होईल या देहास। ते घडो येथे।।

त्यानंतर आक्कास्वामी आणि उद्धवस्वामींना बोलावुन घेऊन गडाची आणि संपुर्ण संप्रदायाची व्यवस्था समर्थांनी लावुन दिली. त्यांच्या पश्चात श्रेष्ठांच्या मुलांना गडावर आणुन त्यांच्या आज्ञेत संस्थान चालवावे असे समर्थांनी शिष्यांना सुचित केले. माघ कृष्ण पक्षात पंचमी तिथीस मल्हारराव लिंबराव थेऊरकर आणि केशव गोसावी तंजावरहून रामरायाची समर्थांनी व्यंकोजीराजांना आज्ञा देऊन बनवुन घेतलेली मुर्ती घेऊन गडावर आले. आपल्या खोलीत या मुर्तीसाठी समर्थांनी जागा केली. एक सिंहासन केले. त्यावर या मुर्तीची स्थापना केली. अन्ना सह पाण्याचाही समर्थांनी त्याग केला आणि या मुर्तीची यथासांग पुजा समर्थांनी केली. माघ कृष्ण षष्ठीस समर्थांनी सर्व शिष्यांना खोलीत बोलावले. आपल्यास लवकरच देहत्याग करावा लागणार हे आपल्या शिष्यांना समजले आहे का, हे पाहण्यासाठी त्यांनी एक श्लोक अर्धवट म्हणला. 

रघुकुळटिळकाचा वेध संनिध आला।
तदुपरी भजनासी पाहीजे सांग केला।।

एवढं म्हणुन समर्थ आपल्या शिष्यांकडे पाहु लागले. उद्धवस्वामी उभे राहीले आणि पुढच्या ओळी त्यांनी पुर्ण केल्या..

अनुदिन नवमी हे मानसीं आठवावी।
बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी।।

इतके म्हणताच क्षणी समर्थांनी उद्धवला शब्बासकी दिली. शिष्य घाबरले. डोळ्यातुन अश्रुधारा वाहु लागल्या. समर्थ म्हणाले, 'इतके दिवस अध्यात्म ऐकल्याचं हेच फळ काय?' तेव्हा आक्कास्वामी स्वतःला आवरत म्हणाल्या,' या पुढे लवकरच या सगुण मुर्तीचे दर्शन होणार नाही, याचे दुःख वाटते.' समर्थ म्हणाले,

माझी काया गेली खरे। परी मी आहे जगदाकारे।
ऐका स्वहीत उत्तरे। सांगेन ती।।
नका करु खटपट। पहा माझा ग्रंथ नीट।
तेणें सायुज्यची वाट। ठाई पडे।।
राहा देहाच्या विसरे। वर्तु नका वाईट, बरें।
तेणें मुक्तीची ही द्वारें। चोजविती।।
रामदास म्हणे सदा-। स्वरुपी अनुसंधान।
करा श्रीरामाचे ध्यान। निरंतर।।

असे म्हणुन समर्थांनी सर्वांचे समाधान केले. नवमीस समर्थ लवकर उठले आणि रामरायाच्या मुर्तीपुढे बसले. उद्धवस्वामींनी बाहेर जिजोजी काटकर हवालदार, मुद्राधारी व गडकरी मंडळी खोलीबाहेर दर्शनास आल्याच समर्थांना सांगितलं. समर्थांनी सर्वांना आत येण्याची परवानगी दिली. जिजोजी काटकरांनी समर्थांच्या पुढे मनुके व साखर ठेवली व विनंती केली की, 'कित्येक दिवसांपासुन स्वामींनी अन्न पाण्याचा त्याग केला आहे. किमान आम्हां सर्वांच्या समाधानासाठी थोडे साखर पाणी घ्यावे.' समर्थांनी थोडे साखरपाणी घेतले आणि सर्वांचे समाधान केले. आक्कास्वामी म्हणाल्या, 'पारमार्थिक दृष्ट्या स्वामी जरी जगदाकारे असले, पण पुढे पुन्हा संभाषण आणि दर्शन होणार नाही याचा खेद होतो.' तेव्हा समर्थ म्हणाले,

आत्माराम दासबोध। माझे स्वरूप स्वतः सिद्ध।
असता न करावा खेद। भक्तजनी।।

समर्थांनी रामरायाच्या मुर्तीस साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या जवळ खोलीत उद्धवस्वामी, आक्कास्वामी, केशवस्वामी, शिवरामस्वामी व त्यांची बहीण इतकीच मंडळी होती. समर्थांनी डोळे भरुन रामरायाकडे पाहिले आणि म्हणाले,

जन्मोनिया तुज भजो याच बुद्धी।
प्राणत्याग संधी सांभाळीसी।।
उचित न चुके अचिंत्य श्रीरामा।
स्वस्वरूपी आम्हां ठाव देईं।।
जन्मभरी तुज धरिले हृदयीं।
अंती या समयी पावें बा गा।।
निष्काम ती तुज सेवायाची आशा।
अंती रामदासा सांभाळावे।।

असे म्हणुन समर्थांनी एकवीस वेळा 'हरहर' उच्चारुन 'जय जय रघुवीर समर्थ' म्हणुन मुर्तीकडे अवलोकन केले आणि त्यांच्या मुखातुन दिव्य तेज निघुन ते रामरायाच्या मुखात प्रविष्ट झाले. समर्थांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली. तोच आजचा दिवस, दासनवमी!!

महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील महत्वाचे संत म्हणजेच समर्थ रामदासस्वामी! आयुष्यभर 'आधी केले, मग सांगितले' या न्यायाने वावरणारे समर्थ हे एकमेव संत होत आणि म्हणुनच ते त्यांचं वेगळेपण! रामरायाच्या उपासनेसह बलोपासनाही करण्यास सांगणारे समर्थ हे एकमेव संत. तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीचा अंगार फुलविणारे संत म्हणजेच समर्थ रामदासस्वामी! म्हणुनच ते खऱ्या अर्थाने 'राष्ट्रगुरु' आहेत! भगवान श्रीधरस्वामी म्हणतातच,

राष्ट्रा उर्जित काल की जरी हवा सांगा हिता चांगले।
लावा की जनीं लक्ष या प्रभुपदी वागा जसे बोधिलें।
राष्ट्रा सद्गुरु हेचि मानून पदी लिनत्वि गर्जु भलें।
विश्वोद्धारी विभु समर्थ जगती त्यांची नमूं पाउलें।।

आज दासनवमीच्या मुहूर्तावर समर्थांनी आपल्याला दिलेल्या 'आत्माराम उपासनेच्या' मदतीने आपल्या धर्मकार्यात भगवंतांचे अधिष्ठान मिळवुयात. 'तु मज सिंहाचे पिलू', असं आपल्या दासांना प्रेमाने म्हणणारे समर्थ आपल्या पाठीशी आहेतच! अजुन काय हवे?


।।जय जय रघुवीर समर्थ।।


- © श्रेयस पाटील