पृथ्वीवरत्या देशोदेशी जागा आहेत हवेशीर।
असा नक्षा तुळशीबागेचा नसे कोठे आकार।।
बांधिला तो पुणे शहरी आराम मध्यावर।
त्यात उभा सिंहासनी वेधणार दशमुखशीर।।
लक्षुमण दक्षिण बाजू वामांगी सीरंजन।
तूं तुळशीबागेमध्ये भज रे हृदयीं दशरथनंदन।।
पेशवाईतील एक प्रख्यात कवी, मनोहर याने स्रीयांसाठीच्या आपल्या गाण्यात केलेलं हे तुळशीबागेतील रामरायाचं वर्णन! तुळशीबाग! समस्त पुणेकरांचं अगदी जिव्हाळ्याचं स्थान.
तुळशीबाग तशी राममंदिरासाठी प्रसिद्ध, आणि सध्या पाहायला गेलं तर तेथील बाजारपेठ ही पुणेकरच नव्हे तर मुंबईकरांसह इतर शहरवासीयांनाही भुरळ घालणारी एक मोहिनीच! पुण्याच्या एक भेटीतही आवर्जून भेट द्यावी असं हे ठिकाण. तुळशीबागेचा दिमाख पाहिला तर पुणेरी स्वाभिमान हा दिसल्यावाचून राहणार नाही!
असं काय आहे या तुळशीबागेत? हा प्रश्न एखाद्याने विचारावाच पुणेकर नागरिकाला! तर त्याला लगेच अस्सल पुणेरी उत्तर मिळेल. 'अरे काय नाहीये आमच्या तुळशीबागेत! मुंबईच्या समुद्रासारखी दागिन्यांची लखलख आहे. मंत्रालयाचा रुबाब आहे. कदाचित त्या ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या तज्ञांपेक्षा जास्त मोठया तज्ञांनी घडवलेले दागिने आहेत. अरे कदाचित काही वर्षांनी आफ्रिकेच्या जंगलात वाघ मिळणार नाहीत, पण पुण्यात तुळशीबाग असेलच!!' हं! आठवलं का काही हे ऐकून?? असो.
पुण्यनगरीत वसलेली ही तुळशीबाग म्हणजे स्त्रियांसाठी 'मोहजाल'च! स्वयंपाकाची भांडी असोत वा सजावटीचं साहित्य असो, सौंदर्यप्रसाधने असोत किंवा दागदागिन असोे, पूजाअर्चेची सामग्री असो वा देवादिकांच्या सुबकसंपन्न मुर्त्या असोत..काय नाही इथे! पुणेकरांच्या सामान्य गरजांपासून शौकिनांच्या कलाकुसरीच्या मागण्यांपर्यंत सारं काही दिमाखात गजबजलेली ही तुळशीबागेची समृद्ध बाजारपेठ!
या तुळशीबागेच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे ते रामरायाचं मंदिर आणि थोडया अंतरावरच विराजमान झालेला श्री महागणपती. पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींपैकी हा चौथा गणपती. भव्य आणि देखणी अशी ही गणरायाची मूर्ती म्हणजे प्रसन्नतेचा अविष्कारच! मानाच्या गणपतीच्या याच मंदिरामागे दगडी बांधकाम असलेले पेशवेकालीन मंदिर आहे. हाच तो पुरातन तुळशीबागेचा गणपती! उत्तराभिमुखी सिंदूरचर्चित असलेली गणरायाची ही मूर्ती त्यावरील कोरीवकामाच्या रुबाबात तितकीच विलोभनीय भासते. महागणपतीचे विश्वस्त मंडळीच याही मंदिराची देखभाल करतात. आणि याही मंदिरामागे असलेले श्रीराम मंदिराचे प्रवेशद्वार.. असा हा भक्तिरसात न्हाऊन निघालेला हा मंगलमय परिसर! मात्र आजूबाजूला अगदी आपली नजरेच्या आवाक्यात दिसतील ती दुकानेच दुकाने! अशी ही पुणेकरांनी सदाबहरेली तुळशीबाग.
पण आता तुम्ही म्हणाल, की या तुळशीबागेबद्दल तुम्ही खूप काही सांगितलेत. पण मुख्य जे पाहायला आलो ती चारी बाजूंना तुळशीच तुळशी असलेली बाग दाखवा की! या तुळशीबागेचा मागोवा घ्यायचा म्हणजे आपणास थेट जावे लागेल ते त्या 'श्रीमंत पेशवाईत'! इतिहासाच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेवतच चला तर मग जाऊ 'मूळ तुळशीबागेत'!!
जयाने स्वशौर्ये पुणे रक्षियेलें।
जये पुण्यनगरी सह भूषविले।
तशी मंदिरी स्थापिली राममुर्ती।
अशी पंत नारो खिरे ख्यात किर्ती।।
पेशवाईतील गोष्ट! साताऱ्याजवळील पाडळी गावात आप्पाजी खिरे नावाचे एक गृहस्थ राहत. हे त्या गावचे वतनदार असून त्यांच्याकडे या गावच्या कुलकर्णीपणाची जवाबदारी होती. आप्पाजींना नारायण नावाचा धाकटा मुलगा होता. तो कुटुंबात फार लाडका होता. साधारण १७०० च्या दरम्यानचा याचा जन्म! स्वभावाने हट्टी असल्याने त्याच्या भविष्याबद्दल आई-वडिलांना फार चिंता वाटत होती. एकदा आई त्याला यावरुन काहीतरी बोलली म्हणुन हा नऊ दहा वर्षांचा मुलगा 'आपलं नशीब मी स्वतः घडवुन दाखवीन' या इर्षेने घरातून निघाला तो थेट पुण्यात आला. दिवसभर शहरभर फिरून थकलेला नारायण पुण्यातील आंबिल ओढ्याकाठी
असलेल्या रामेश्वराच्या मंदिरात आला आणि महादेवाचे दर्शन घेऊन तिथेच निजला. तेथे दररोज सूर्योदयाच्या वेळेस गोविंदराव खासगीवाले देवदर्शनासाठी येत. त्यादिवशी त्यांची नजर गाढ झोपलेल्या नारायणावर पडली. त्याला उठवून त्याची संपूर्ण आस्थेने विचारपूस करून त्यांना परिस्थितीची जाणीव झाली व त्यांनी लगेचच लहानग्या नारायणाला आपल्या शागिर्दांमध्ये नोकरीस ठेवून आश्रय दिला. तेथे त्याला लाडाने 'नारो' म्हणत. हेच नाव पुढे कायमस्वरूपी रूढ झाले व नारायणाचा 'नारो आप्पाजी खिरे' झाला. ब्राह्मण असलेल्या नारोला खासगीवाल्यांनी दैनंदिन पूजा-अर्चेसाठीसाठी तुळशी, बेल, फुले आदी आणण्याचे काम सोपवले. आज जी तुळशीबाग आहे ती त्या काळी पुण्याच्या बाहेर होती. तो पुण्याच्या बाहेरचा परिसर होता. एक एकरभर पसरलेल्या या जागी त्या काळी खासगीवाल्यांची स्वतःच्या मालकीची तुळशीची बाग होती. विविध फुलांनी बहरलेल्या या बागेत तुळस मोठ्या प्रमाणावर होती यावरून बागेचे तुळशीबाग नाव प्रचलित झाले. नारो याच बागेतून तुळशी-फुले नेत असे. आपल्या नित्यनियमित मेहनतीच्या बळावर त्याने खासगीवाल्यांचा विश्वास संपादन केला. कामातील निष्ठा पाहुन पुढे खासगीवाल्यांनी आपल्या लाडक्या नारोला पेशव्यांच्या खासगीतील हिशोब वगैरे करण्यासाठी चाकरीत सामावुन घेतले. पुढे नानासाहेब पेशव्यांनी त्याची कामाची पद्धत, शिस्त, वागणुक आणि चोख हिशोब वगैरे पाहुन त्याला कोठी खात्याच्या कारकून पदावर नेमले. पेशव्यांच्या दरबारी अचानक आलेल्या मोठ्या जबाबदारीने त्याला काहीसा गर्व निर्माण झाला. एकदा दसऱ्याच्या दिवशी मेजवानीसाठी बोलावले असता इतर मुख्य आमंत्रितांप्रमाणे आपणास चांदीचे ताट वगैरेचा मान न मिळता साध्या पंगतीत बसविल्याने त्याचा अहंकार जागा होऊन झाल्या गोष्टीचा द्वेष मनात ठेवून तो उपाशीपोटीच तिथून निघून गेला. खासगीवाल्यांनी झाल्या प्रकारावरून माणसे पाठवून नारोला धरून आणण्याचे आदेश दिले. संतापलेल्या खासगीवाल्यांनी त्यास कडक शब्दांत सुनावले व समज दिली. नारोला आपली चूक लक्षात येताच त्याने त्याबद्दल माफी मागितली. नारोची कामातील कसब लक्षात घेता त्यास माफी देऊन खासगीवाल्यांनी त्याची रवानगी साताऱ्यास छत्रपतींच्या दरबारी जमाखर्च लिहिण्याच्या कामी केली. छत्रपतींचाही विश्वास संपादन करून नारोने तेथेही आपल्या मेहनतीची छाप उमटवली. छत्रपतींनी त्याला इंदापुर प्रांताचा मुकादम केले. 'कामाचे मर्दाने लिहिणारा' असा नारो आप्पाजीचा लौकीक झाला. १७४७ साली पेशव्यांनी नारोची पुणे दरबारी गरज असल्याचे सांगुन त्यास पुणे दरबारी पाठविण्याची विनंती छत्रपतींना केली. छत्रपतींनी ती विनंती मान्य करून नारो आप्पाजीस पुणे दरबारी पाठविले. पुण्यात आल्यावर नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुणे सुभ्याची दिवाणगिरीची जवाबदारी सोपविली. त्याचसोबत पेशव्यांच्या कोठी खात्याचे कारभारीपद देखील त्यांस दिले. तसेच १७४९ साली खासगीवाल्यांच्या तुळशीबागेचीही व्यवस्था नारो आप्पाजींवर सोपवली.
काम करण्याची पद्धत, मुत्सद्दीपणा वगैरे गुण पाहुन १७५० साली नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुण्याचे सरसुभेदार केले. पुढे पुणे शहराचे मुख्य रचनाकार या नात्याने नानासाहेब पेशव्यांचे स्वप्नातील पुणे शहर निर्माण करण्यात नारो आप्पाजींनी खुप मोलाची मदत केली. यामुळे नानासाहेबांचा नारो आप्पाजींवरचा विश्वास अधिकच दृढ झाला. श्रीमंती वाढली. वेळप्रसंगी अनेक गोष्टी त्याग करून आपल्या पेशव्यांसाठी स्वतःच्या तिजोरीतुन ते पैसा पुरवीत. १७५७ साली नानासाहेबांनी नारो आप्पाजींना पालखीची नेमणुक करून दिली. पुण्यात एक रामाचे मंदीर असावे असे नारो आप्पाजींच्या मनीं आले. १७५८ साली यासाठी त्यांनी खासगीवाल्यांकडून एक एकरभर पसरलेली तुळशीबाग विकत घेतली. तुळशी काढुन तेथील जागा त्यांनी मंदिरासाठी मोकळी केली. तटबंदीचे बांधकाम करून त्यांनी पेशव्यांकडे राम मंदिर बांधण्याची परवानगी मागितली. नानासाहेबांनी ही मागणी मंजुर केली. आणि माघ महिन्यात या मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. तुळशीबागेचे 'मालक' झाल्याने त्यांना लोक 'तुळशीबागवाले' म्हणुन संबोधु लागले आणि त्यांचे खिरे हे आडनाव लोप पावले.
दरम्यान पानिपताच्या पराजयाने खचुन नानासाहेबांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने हे बांधकाम थांबले. संपूर्ण पुणे या दुहेरी दुःखात बुडाले होते. यापुढील पेशवेपदाचे मानकरी असलेले थोरले माधवराव यांनी काही दिवसांनी स्वतः तुळशीबागवाल्यांना बोलावून राम मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरु करण्याची आज्ञा केली. १७६३ सालच्या अखेरीस मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम पुर्ण झाले आणि विधिपूर्वक समारंभाने मंदिरास उंबरा बसविण्यात आला. मंदिराला १४० फुट उंच शिखर बांधण्यात आले होते. त्यावर नारो आप्पाजींनी सोन्याचा कळस चढविला. राममंदिराचे काम पुर्ण झाल्यावर थोरल्या माधवरावांनी पेशव्यांनी तुळशीबागवाल्यांना वढू हे गाव इनाम दिले. तसेच मंदिराच्या दैनंदिन खर्चासाठी सरखेल आंग्रे यांनी कुलाबा गाव इनाम दिला. १७६५ साली उमाजीबुवा पंढरपुरकर यांच्याकडुन रामरायाची सुंदर मुर्ती घडविण्यात आली आणि तिची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली. यानंतर राम मंदिराच्या आजुबाजुला अनेक छोटी मंदिरे उभारून त्यात गणपती, विष्णु, त्र्यंबकेश्वर महादेव, विठ्ठल रखुमाई इत्यादी देवतांची स्थापना केली. रामापुढे दासमारूतीची स्थापना केली. या सर्व मुर्ती घडविण्यास एकूण ३५० - ४०० रुपये खर्च आला. मंदिराला एक मुख्य दरवाजा बांधण्यात आला. याचे 'संगीत दरवाजा' असे नामकरण करण्यात आले. येथील पहिल्या रामनवमी उत्सवास २००० रुपये खर्च आला. सारे काही पेशवाईच्या थाटात पार पडले मात्र मार्च १७७५ साली वयाच्या ७५व्या वर्षी नारो आप्पाजी खिरे उर्फ़ तुळशीबागवाले यांचे पुण्यात देहावसान झाले व तुळशीबागेने आपला 'निर्माता' गमावला तो कायमसाठीच!
तुळशीबागवाल्यांच्या मृत्युनंतरही तब्बल २० वर्षे राम मंदिराचे बांधकाम चालले. खरड्याच्या लढाईनंतर सवाई माधवराव पेशव्यांनी संगीत दरवाज्यावर नगारखाना बांधला आणि तिथे वर्षासने लाऊन नित्य सनई चौघडा झडू लागला. शनिवार तिसऱ्या प्रहरी थोरल्या बाजीराव पेशव्यांना पुणे इनाम मिळाले. याची आठवण म्हणुन दर शनिवारी दुपारी ३ वाजता साधारण अर्धा तास चौघडा वाजवण्याची प्रथा सवाई माधवरावांनी सुरु केली जी आजतागायत सुरु आहे. मंदिराच्या दक्षिणेला आणि पश्चिमेलाही प्रवेशद्वार पेशव्यांनी बांधुन घेतले. १७८९ मध्ये मंदिरातील देवांच्या दागदागिन्यांची चोरी झाली. तेव्हा सवाई माधवरावांनी दोन हजार चौदा रुपये बारा अणे इतक्या किमतीचे दागिने रामरायास अर्पण केले. मंदिराचा नित्य चौघडा १८९५ मध्ये सुरु झाला. एकुण ३५ वर्ष राम मंदिराचे बांधकाम चालु राहिले, ज्याला त्याकाळी १ लाख ३६ हजार ६६७ रुपये खर्च आला. श्रीमंत सवाई माधवराव इथे नेहमी दर्शनास येत. त्यांच्या कारकिर्दीत हे मंदिर फार प्रसिद्ध झाले. कविवर्य मोरोपंत आपल्या आर्येत वर्णन करताना म्हणतात,
श्रीरामाच्या मुर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या।
ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या।।
अशी मंदिराची ख्याती होती. ह्या मंदिरात कीर्तन, प्रवचनकारांचा, पुराणिक, कथाकारांचा राबता असे. त्या सोबतच साधु, फकीर, मांत्रिक, विद्वान असे श्रुती स्मृतीचे वक्ते, वगैरेंची सततची रेलचेल असे. असे या मंदिरात जो कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार श्रोत्यांची वाहवा मिळवी, तो सगळीकडेच श्रेष्ठ समजला जाई, अशी या ठिकाणचे महत्त्व होते. दर एकादशीस छबिना मिरवणूक मंदिर आवारात होत असे. पुण्यातील प्रतिष्ठित व्यक्तींपासून ते अगदी कुणबीणींपर्यंत सारे या दिवशी दर्शनास येत. बाहेर तर यात्रा असल्यासारखी दुकाने थाटत.
रामनवमी दिवशी रामेश्वर मंदिरापासून रामरायाच्या पोशाखांची मिरवणूक निघत असे. मग तो पोशाखाने रामरायाला सजवून दुपारी रामरायाचा जन्मकाल साजरा होई. मारुती जवळ रामरायाचा पाळणा असे आणि त्या पाळण्याला झुलविण्यासाठी लाल कापडाची एक दोरी करून बांधलेली असे. जन्मकाळानंतर ह्या दोरीच्या बारीक चिंध्या काढल्या जात आणि लोक प्रसाद म्हणून त्या घरी घेऊन जात. हा प्रसादाने घरी लक्ष्मी घरात वास करते अशी आख्यायिका होती. असा हा उत्सव आजही साजरा होतो.
अशी ही पुण्यनगरीची मूळ तुळशीबाग! ही खरी तुळशीबागेची अोळख. पण आज ती ओळख लयाला गेली आहे. इतकेच नव्हे तर पुण्याचं 'पुणेपणंच' नाहीसं झालं असे म्हटले तरी त्यात वावगे नाही. १८१८ साली पेशवाईचा अस्त झाला आणि या नगरीची श्रीमंतीही लोप पावली. पुणे शहराचा पेशवाई पोशाखच जणू उतरला आणि पुणे काहीसे भकास वाटू लागले. शृंगार उतरविलेल्या देखण्या स्त्री सारखे! पुढे १९४२ सालच्या चळवळीत तर पुणे भरडून निघाले. जुन्या सांस्कृतिक परंपरा कमी होऊ लागल्या आणि पानशेतच्या प्रलयातबतर पुण्यनगरी पार वाहून गेली. यात तुळशीबागेचंही रूप पालटलं. तुळशीबागेतही आता सगळीकडे व्यापाऱ्यांची झुंबड निर्माण झाली आहे. प्रारंभी दर एकादशी दिवशी लहान-मोठी अशी काही दुकाने वसू लागली. पुढे हळू हळू त्यात कमालीची वाढ होत गेली आणि तुळशीबागेला बाजारपेठेचे रूप प्राप्त झाले. स्त्रियांना उपयुक्त अशा वस्तूंनी भरलेल्या या बाजारपेठेत एकादशीस भरपुर गर्दी होत असे. मग काही वर्षांनी म्हणजे १०० वर्षांपूर्वी एका कर्नाटकातील व्यापाऱ्याला मंदिराच्या आवारातच कायमस्वरूपी दुकान थाटून तिथे स्त्रियांची गंगावणं आणि सौंदर्यप्रसाधनं विकण्यासाठी जागा दिली गेली. हे तुळशीबागेतील पहिलं दुकान! अशा रीतीने व्यापाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊन
तुळशीबागेतील दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. दररोज दुरदुरून येणारे असंख्य लोकांची इथे वर्दळ असते. पण या तुफान गर्दीत पुण्याचं 'पुणेपण' नाहीसं झालंच आणि या जुन्या 'मुळ, खऱ्या' तुळशीबागेची ओळखही हरवली. आजच्या पिढीला ही ओळख पटणे गरजेचे आहे.असो. रामरायच्या तुळशीबागेने आज मात्र एका 'श्रीमंत' बाजारपेठेचे रूप घेतले आहे. आता अगदी पुण्याच्या भेटीस आलेला प्रत्येकजण तुळशीबागेत येतोच येतो. खरेदीसाठी!! पण इथुन पुढे आठवणीने खरेदी करण्या आधी या रामरायाच्या, महागणपतीच्या दर्शनासाठी नक्की जाण्याचा संकल्प करूया. कारण हे राममंदिर म्हणजेच 'तुळशीबाग' नव्हे का? या सुंदर रामरायाचं नित्य दर्शन घडावं, कारण-
तुळशीबागेमध्ये असे बरवी मूर्ती श्रीरामाची।
नयनीं नित्य पाहता हरतील पापे अनंत जन्माची।।
- © श्रेयस पाटील