श्रीमंत पेशवे प्रधान बहुप्रितीचे।
अष्टप्रधानात उतरले मर्जीत महाराजांचे।।
पर्वतावरती पर्वती स्थान वरती चौघडा।
पाहेऱ्या तळापर्यंत जावें धडधडा।।
पुढें तळे तयामधें लहान बेटाचा तुकडा।
गणपती त्यात पलीकडेस आंबील अोढा।।
पुणे! मुळा- मुठा नद्यांच्या तिरावर वसलेलं एक गाव!
कुंभारली, कासारली ही दोन गांवे आणि त्याच्या मध्ये एक लहान वाडी होती. आत्ताचा जो कसबा पेठ भाग आहे, तेवढीच हि लहानशी वाडी होती. पुढे ही वाडी आणि शेजारची दोन गांवे मोडुन त्याच एकत्रीकरण दिल्लीच्या बादशाहने केले आणि नाव दिले 'कसबे पुणें'!! शहाजी राजांना पुणें इनाम मिळाल्यावर तिथे कसब्याच्या अगदी बाहेर त्यांनी आपला एक वाडा बांधला ज्याचे नाव अंबरखाना अर्थात लाल महाल! दादोजी कोंडदेव यांस तिथली जवाबदारी दिली आणि पुढे जिजाऊसाहेब आणि बाल शिवाजी राजे वाड्यात राहु लागले. कसबे पुणे गावाची झालेली दुरवस्था पाहुन जिजाऊ माँसाहेबांनी वाडीचा विकास करायला सुरुवात केली. सुरुवातीला आपल्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान असावे म्हणुन की काय त्यांनी कसब्यातच गणपतीचे देवालय बांधले आणि त्यात गजाननाची स्थापना केली. हाच कसबा गणपती!
गजाननाच्या आशीर्वादाने शुभारंभ झाला. माँ साहेबांनी आणि शिवाजीराजांनी कसबे पुणें गावाचा भरपुर कायापालट केला. त्यांच्याच हातुन स्मशानवत जमिनीवर सोन्याचा नांगर फिरवुन पुणें गावाच्या विकासाला झालेली सुरुवात म्हणुनच पुणे पुढे इतकं नावारूपाला आलं, असं म्हणालो तरी वावगे ठरणार नाही.
पुढे शाहु महाराज मुघलांच्या कैदेतुन सुटुन मराठी राज्याच्या गादीवर बसे पर्यंत पुणें शहरात बरेच बदल झाले. विकास ही झाला. मराठ्यांकडुन मुघल आणि मुघलांकडून निजामाकडे हा मुलुख गेला आणि पुढे शाहूमहाराजांनी चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार मुघलांकडून प्राप्त करविल्यावर कसबे पुणे पुन्हा मराठी राज्यात शाहुराजांकडे आले.
१७२६ साली शाहु महाराजांनी हे गाव थोरले बाजीराव पेशवे यांना इनाम दिले आणि तिथुन पुढे 'कसबा पुणे' या गावाच्या विकासाचा आलेख चढत गेला आणि त्याचे शहर पुणें झाले. मराठी राज्याचेही मराठी साम्राज्य झाले आणि या शिवसमर्थांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याची राजधानी होण्याचा मानही या कधी एकेकाळी लहानशी वाडी असलेल्या 'शहर पुण्याला' मिळाला!! बाजीराव साहेबांनी पुण्यात आल्या आल्या लाल महालापासुन जवळच काही अंतरावर आपला राहायचा वाडा बांधला. याचे नाव शाहु महाराजांच्या पत्नीच्या इच्छेनें 'शनिवार वाडा' असे केले गेले. इथूनच राऊ पेशवेपदाचा कारभार पाहु लागले. वाड्याच्या बाजुला पुर्ण पुणें गावात व्यापाऱ्यांना, सावकारांना आपले वाडे आणि उद्योग धंदे वसवण्यास त्यांनी परवानगी दिली आणि गावाची प्रगती सुरु झाली. काही पेठा सुद्धा त्यांनी वसवल्या आणि पुण्याचा विस्तार सुरु झाला.
गावाच्या नैऋत्येस एक टेकडी होती. या टेकडीवर फार पुर्वीपासुन पर्वताई देवीचं लहानसं मंदीर होतं. ही देवी जागृत आहे अशी गावकाऱ्यांची श्रद्धा होती. बाजीराव साहेबांनीही या देवीच्या मंदिराचा जिर्णोध्दार करायचं ठरवलं होतं पण दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यु झाला आणि ही इच्छा अपुर्णच राहिली. मात्र पुढे त्यांचे पुत्र नानासाहेब हे पेशवे झाले आणि त्यांनीही पुणे गावचा विकास करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणुन त्यांनी पर्वताई देवीच्या मंदिराचा कायापालटच केला! तिथे देवीच्या मंदिरासोबतच देवदेवेश्वर महादेव आणि शिवपंचायतन देवतांची स्थापना केली. इथली पूजा अर्चा आदी व्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांनी 'देवदेवेश्वर संस्थान' स्थापन केले. हीच पुण्याची पर्वती! याबद्दल विस्तृत माहिती आपण माझ्या मागील काही लेखांमध्ये घेतली आहे. त्यामुळे पुन्हा इथे जास्त काही देत नाही.
पुण्यात इतर काही नवीन पेठा, जुन्या पेठांचे विस्तारीकरण, नवीन उद्योगांना प्रोत्साहन आणि सर्वांना पोषक असे वातावरण, यांमुळे पुणे गाव गजबजून गेले. गावचे शहरात रूपांतर झाले. लोकवस्ती भरपूर वाढली. वाढत्या लोकसंख्येमुळे त्यांना लागणाऱ्या गरजांचा अंदाज आल्यावर श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी दगडी नळांवाटे कात्रजच्या तळ्यातुन पाणी आणलं आणि पुण्यात सगळीकडे ते फिरवुन ठिकठिकाणी हौदात सोडलं. या मुळे पाण्याचा प्रश्न सुटला. पर्वतीचाही भरपूर विकास झाला होता आणि पर्वती तिथल्या शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे त्यांचं आवडतं ठिकाण बनलं. नानासाहेबांनी पुढे नागरिकांना निवांत 'ऑफिस सुटल्यावर' फिरण्याकरिता पुण्यात वेगवेगळे बाग बगीचे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. असे एकुण तेरा बागा नानासाहेबांनी निर्माण केल्या. त्यातील एक, 'सारसबाग'..!!
पर्वतीच्या विकासानंतर टेकडीच्या आजुबाजुला त्यांचे लक्ष गेले आणि तो परिसर सुशोभित करण्याचे नानासाहेबांनी ठरवले. त्यासाठी नानासाहेबांनी पर्वतीच्या पायथ्याला आंबील ओढ्याला लागुन एक तळे आणि त्यात बाग करण्याचे ठरविले. तसे आदेश त्यांनी १७५५ साली खासगीवाल्यांना दिले. त्यानुसार तळे खोदण्याचे काम सुरु झाले. काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो की शनिवारवाड्याचा कोट किंवा वाड्यातील इतर इमारती बांधण्यासाठी तिथुन माती नेली म्हणुन तिथे आपोआप मोठा खड्डा पडला. पण याचं खंडण ना. वि. जोशी यांनी अगदी उत्तम पद्धतीने केलं आहे. ते म्हणतात की, वाडा बांधायला वाड्याच्या बाजुला भरपुर जमीन मोकळी असताना इतक्या लांब अंतरावरुन का आणतील माती कुणी? बरोबरच आहे! ते बुध्या खणूनच केले असावे! हा तलाव पुर्ण पंचवीस एकरात पसरला होता आणि तळ्याच्या मध्यभागी बाग करण्यासाठी २५००० चौरस फुटाचा भाग सोडला होता. पण हे तळे खोदण्याचे काम कामगारांच्या कामचुकारपणा मुळे पुढे किती तरी वर्षे चालले!
याबद्दल ही एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा श्रीमंत नानासाहेब पेशवे देवदर्शनासाठी पर्वतीवर चालले होते. तेव्हा या तळ्याच्या 'साईट' जवळून जाताना त्यांनी ते निवांतपणे चाललेले पाहिले. नानासाहेब चिडले आणि स्वतः पालखींतून उतरुन ते दगड माती उचलु लागले. आता स्वतः पेशवाच काम करु लागला पाहून कामगारांना आपली चुक लक्षात आली. त्यांनी पुढे लवकर काम पुर्ण केले. राखुन ठेवलेल्या मधल्या टेकाडावर मग सुंदर बाग केली गेली आणि कडेला तळ्यात पाणी सोडण्यात आले. यामुळे हा भागही भरपुर सुशोभित झाला. या बागेला नानासाहेबांनी 'सारसबाग' असे नाव दिले. असे म्हणतात, की या बागेतुन पेशवाईत शोभेचे दारुकाम केले जायचे आणि पेशव्यांसह सरदार मंडळी हा नेत्रसुखद अनुभव घेण्यासाठी पर्वतीवर जाऊन तिथुन ही आतषबाजी पाहायचे. कल्पना करून पहा कसे दिसत असेल!
श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेत टेकाडावर आपले आराध्यदैवत गजाननाचे लहान मंदीर उभारले आणि त्यात सिद्धिविनायक गणेशाची प्रतिष्ठापना केली. हे साल १७८४. या गणेशाची दैनंदिन व्यवस्थेची जवाबदारी देवदेवेश्वर संस्थान कडे त्या वेळी देण्यात आली. या तलावाबद्दल ही काही उल्लेख आढळतात. त्याला आपण सध्या आख्यायिकच समजु. तर या तळ्यामध्ये पेशवे आणि सरदार लोक गुप्त चर्चा करण्यासाठी नौकाविहाराच्या निमित्ताने येत. नौकेत बसुन ते विविध चर्चा करीत. ही माहिती बाहेर फुटू नये या साठी ही त्यांनी काळजी घेतली होती. या नावांचे नावाडे एक तर मुके असत किंवा बहिरे असत.
सारसबाग, तळे आणि सिद्धीविनायक गणपती मंदिर हे अगदी आवडती ठिकाणं झाली आहेत पुणेकरांची! सध्या सारसबागेत तळ्यातील टेकाडावर बाग काढुन सुंदर आणि भव्य सिद्धिविनायकाचे देवालय उभे आहे. कडेच्या तळ्याच्या जागी सुंदर बाग करण्यात आली आहे. दररोज साधारण दहा हजार माणुस गणपतीच्या दर्शनाला येत असते. चतुर्थी व इतर प्रसंगी हा आकडा ऐंशी हजारापर्यंत जाऊन पोहोचतो. डोळ्यात भरेल असं सुंदर मंदीर देवदेवेश्वर संस्थानने बांधलं आहे. १८८२ साली सवाई माधवराव साहेबांनी प्रतिष्ठापित केलेली सिद्धीविनायकाची मुळ मुर्ती भंगली. त्या नंतर लगेच हुबेहूब नवीन मुर्ती घडवुन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने समारंभपूर्वक प्रतिष्ठापना करण्यात आली.
पुण्यात असुन सारसबागेत आलो नाही, हे अशक्यच! सुंदर बाग, शहराच्या आजच्या गजबजाटात पक्ष्यांचे किलबिलणे, मधें जाऊन पायऱ्या चढून वर जाणे आणि समोर भव्य मंदीर!! अहाहा! सुंदर!! इतकेच शब्द मुखातुन बाहेर पडतात. पुढे गेलं की सिद्धीविनायक गजाननाचे सुंदर रुप मन मोहवून टाकते. आपसुख हात जोडले जातातW आणि मुखातुन शब्द बाहेर पडतात......
देवदेवेश्वर सुतं देवं सारसोद्यान भूषणम्।
कल्पद्रुमम् त्वम् भक्तानां वंदे सिद्धीविनायकम्।।
- © श्रेयस पाटील