भाऊ नानाचे दुःख ऐकत हृदय फुटले कडाकडी।
मुक्त पावले साहेब नाना केल्या देवा तडातोडी।।धृ।।
भाऊसाहेबाची अचळ बुद्धी, प्रसन्न झाला भगवंत।
अब्दुल्याची खबर ऐकता मनात झाले दुश्चित्त।।
बारा सरदार, बारा उमराव, बसोनी करिती खलबत।
घटका तिथी भट सांगता बरवा आहे मुहूर्त।।
बाईसाहेबांची आज्ञा घेतली जावे हिंदुस्थानात।
ओट्यात घातले विश्वासराव केला हवाला म्हणवीत।।
अष्ट उमराव घेऊनि गेले भाऊसाहेब पानपतावरती।
केला हकारा दिला नगारा स्फुरण आले त्याच घडी।।
बुद्धीचे सागर सदोबा घालुन गेले कशी उडी।
भाऊ नानाचे दुःख ऐकता हृदय फुटले कडाकडी।।१।।
हत्ती घोडे लावलष्कर ते एक एक होता हंबीर।
त्यांची नावे तुम्हा सांगतो जरा ऐकून घ्या सत्वर।।
धाकले नाना कुळाक्षरी त्यांच्या मोहरले फुलशहर।
महिपतराव तेही पानसे तोफखान्याचे सरदार।।
गोविंदराव बुंदेलें अग्नीचा पूल्ला गेला होता रस्त्यावर।
बळवंतराव रणशुर खासा पडला नजरेसमोर।।
विठ्ठल शिवदेव मर्द जातीचा क्षणभर न धरला धीर।
त्याच्या मागे पळोन गेले अंताजी माणकेश्वर।।
बाजी भिवराव अष्ट उमराव रणामधी झाले चूर।
दिल्ली मध्यें तख्त स्थापिलें ठेविलें नारोशंकर।।
असे एक एक ब्राह्मण कितेक लढाऊ लाज वाटती मज थोडी।
अशुद्धाचा महापुर वाहती शिरे उडाली झाडाझडी।।
पांडव दलचा जसा क्षत्रियवीर तारक अर्जुनाचा।
इभ्रामखान व्याघ्र जातीचा सोबती झाला मरणाचा।।
ज्याने सूड घेतला हेतू पुरविला गिलचांचा।
असला दुसरा चाकर होईना निमकहलाल भाऊसाहेबचा।।
वनी राहीले विश्वासराव जीव गोपिका नानाचा।
तिथे भाऊची शुद्ध हरपली सागर होता बुद्धीचा।।
अवघ्या लोकांनी हिम्मत टाकली खांब बुडाला दौलतीचा।
सज्जन म्हणती भाऊ बुडाले मोठा घात झाला आमुचा।।
दुर्जन म्हणती बरवें झाले कांच मिटला जगाचा।
जे गिलचांसवे मिळोनि राहिले हरी ठाव पुसले त्यांचा।।
भाऊसंगे ब्राह्मण मेले, नाही लागत अर्धघडी।
काय तयाची कीर्त सांगावी साहेब नाम धडाधडी।।३।।
होळकर भले झुंजार पळ काढीला लौकरी।
जेव्हा गिलचाचा मार सुटला ठाव देईना त्याला धरत्रीं।।
सोनाजी भापकर मानाजी पायगुडे रणांत राहिल्या रणभेरी।
मोठमोठे सरदार जवळ पडला जनकोजी शिंदा यशवंतराव धारकर।।
राव दमाजी निघुन चालीले असे गळाले क्षेत्री।
समशेरबहाद्दर रणीं थकले कर्त्याची गत आहे न्यारी।।४।।
आम्हीं गाईलें पद साजना जिवा लागल्या झुरणी।
भाऊसाहेबाचे दुःख ऐकता थरथर कांपे मेदिनी।।
रामचंद्रांनी सीता टाकीली जशी येऊ दे भवानी।
रडे गोपिकाबाई एकटी छत्र दिसेना नयनीं।।
विश्वासराव भाऊ बुडाले पानपताच्या मैदानी।
भाऊवाचोनी आम्हांला कोण नेईल पैलतीरीं।।
श्रीमंत महाराज ह्याला प्रसन्न गौरासुरेपाणी।
विश्वासराव भाऊ बुडाले पानपताच्या मैदानी।।
सटवा राम नित्य हमेशा चरणीं, वाजितो चौघडा।
हाच पोवाडा ऐक शाहिरा नित्य होती घडामोडा।।५।।
- शाहिर सटवा रामा
-© श्रेयस पाटील