एक जुने स्त्री गीत


नारायण मारियिला ढासळल्या माड्या।
रोजना करित्याती पागच्या निळ्या घोड्या।।

नारायण मारियिला ढासळल्या भिंती।
रोजना करित्याती त्येच्या आंबरीचं हत्ती।।

नारायण मारियिला पुण्या शेराच्या सावलीला।
जासुदाच्या जोड्या गेल्या पुण्याच्या चावडीला।।

   नारायण मारियीला टाकीला खंदकातु।
चुलती जेवती दुदभातु।।

नारायण मारियिला गेल्या दिल्लीला बातम्या।
सखा मारिला पुतण्या।।

नारायण मारियिला हंबरत्या गाई।
चुलत्या राजसाला कणाव आली नाही।।

नारायण मारियिला पुण्याच्या कोटामंदी।
चुलत्या राजसाच्या घालतो पोटामंदी।।

गोपिकाबाई म्हणी पुण्या शेराला काय करु।
फौजा राहिल्याती दिल्लीवरु।।

गोपिकाबाई म्हणी पुण्या शेराची झाली माती।
नारायण बाळ दिला गारड्याच्या हाती।।

नारायण मारिला दुई दरवाज्याच्या मदी।
वैऱ्या मनसुबा केली कदी।।

नारायण मारिला पुण्या शेराचं झालं जोतं।
गोपिकाबाई म्हणी बाळ वाणीचं माझं होतं।।

नारायण मारिला पुण्या शेराची गेली कळा।
वाण्या उदम्यानं दुकानं केली गोळा।।

पुण्या शेरामंदी फुलं सांडिली जाईची।
सती मिरवली सुन गोपिकाबाईची।।


('भारत इतिहास संशोधक मंडळाने छापलेल्या जुन्या स्त्री गीतात सदर गाणे आढळते. रसदृष्टया गाणें सरस आहे. पण चौदाचौकीच्या पोवाड्यांप्रमाणेच त्यात कल्पनेवर फार भर आहे.'
ऐतिहासिक पोवाडे भाग २ या ग्रंथातुन साभार!)


©श्रेयस पाटील