श्रीमंत महाराज सवाई रावसाहेब मोतीदाणा।
खुप युक्तीने राज्य राखिले यशवंत फडणीस नाना।।ध्रुo।।
रतिवंत महाराज पेशवे माधव विष्णू अवतार।
हिंदुस्थान कर्नाटक तेलंगण काबिज केले सार।।
घरी बसल्या घरीं खंडण्या येती वृत्तांत ऐक साचार।
शिंदे होळकर गाईकवाड नामी नामी सरदार।।
जाट रोहिलें पठाण कापती राजे उदेपुरचा राणा।
खुप युक्तीने राज्य राखिले यशवंत फडणीस नाना।।१।।
जरीपटक्याचे निशाण तात्या हरिपंत सरदारी।
चौखंडांमधी घौंशा वाजतो कइकाला दहशत भारी।।
हुजुरातीची जिलिब चालती मानकरी सेना सारी।
पाटणकर घोरपडे निंबाळकर तलवारीचे धारकरी।।
अपाजी बळवंतराव शिपाईशाईमधी एक दाणा।
खुप युक्तीने राज्य राखिले यशवंत फडणीस नाना।।२।।
भले बुद्धीचे सागर नाना ऐसे नाही होणार।
मर्दाने हो राज्य राखिले मनसोबीच्या तलवार।।
इंग्रेजाला खडे चारिले नाही लागु दिला थार।
दर्यामंदी पिटुन घातले काय सांगु वारंवार।।
बदामीचा किल्ला घेतला ऐसा पुरुष नाही शहाणा।
खुप युक्तीने राज्य राखिले यशवंत फडणीस नाना।।३।।
भले बुद्धीचे सागर बुद्धिवंत बुद्धीचे सागर।
दुष्टांचे निर्दाळण करुनी राज्य राखिले एकछतर।।
श्रीमंतांच्या वाड्यामंदी सबनीस आण्णा खेडकर।
कुल आखत्यारी बंदोबस्ती बाळाजीपंत ठोसर।।
नानापरीचे विलास करितो जैसा गोकुळीचा कहाना।
खुप युक्तीने राज्य राखिले यशवंत फडणीस नाना।।४।।
लक्ष धन्याचे पायी चित्तापासुनी हा ज्याचा भाव।
पहा राइचे पर्वत केले वाढविले माधवराव।।
लग्नासाठी आणले ज्याने मोठे मोठे उमराव।
जागजागी दिल्या बैठका अनंत होतो उच्छाव।।
तखतराय रथ हत्तीचा पुढे वाजे नौबतखाना।
खुप युक्तीने राज्य राखिले यशवंत फडणीस नाना।।५।।
रावबाजीचे पुण्य प्रतापी पुणें शहर केवळ काशी।
गोब्राह्मणा प्रतिपाळीतो दक्षिणा श्रावणमासी।।
टिकून धनया धन्य म्हणे या पेशव्याच्या वंशाशी।
'बाळा बहिरू' करी कविता बसुनिया नित्य गासी।।
सेवक सिताराम ज्यांचा दशनामी भगवा बाणा।
खुप युक्तीने राज्य राखिले यशवंत फडणीस नाना।।६।।
- शाहीर बाळा बहीरू
© श्रेयस पाटील