श्रीमंत जाहले लोक श्रीमंतांपासुन लक्षावधी।
दुरावले श्रीमंत आपल्या दृष्टीस पडतील कधी।।धृo।।
शिंदे होळकर उत्तरेस, पश्चिमेस सेनापती।
पूर्वेकडे भोसले, मिरजकर दक्षिणेस अधिपती।।
हरिपंत नानाच्या पुढे किती बुद्धिमान लोपती।
बृहस्पती आणि शुक्र जसे काय तारांगणी तळपती।।
विपुल त्या रास्त्याच्या घरी आजवर संपत संतती।
इचलकरंजीकर बारामतीकर सोयऱ्यात धनपती।।
पहा कृष्णराव चासकर। कोकणचे कोल्हटकर।
महाशुर सोलापुरकर।।
दिक्षित पेठे साठे ओक ओंकार सभाग्यामधी।
फाटक थत्ते बरवें देवधर पेंडशाची रित सुधी।।१।।
भागवत मंडलीक दामले रामदुर्गकर बळी।
आपा बळवंत पार जाई रणात फोडुन फळी।।
रामाजी माहादेव रणांगणी अडेल मोठे खळी।
कोरळकर देवी भिल्ल कोळ्यांनी गळी।।
झांशीवाले बिनिवाले बुंदेलें रिपु खांडेकर छळी।
कितीक लक्षाधीश प्रतिष्ठित ही घरची मंडळी।।
मर्दाने विंचुरकर। नारो शंकर।
विश्वासुक ओढेकर।।
नायकर नाईक धायबर पाटणकर फाकडें।
मुधोळ गुत्ती गजेंद्रगडकर स्वस्थानी घोरपडे।।२।।
बाइमाने म्हसवडकर। आठवले उबरखेडकर।
रणनवरे राजवडकर।।
पिसाळ शितोळे वाघ आयतुळे लढाईला ते आधी।
शाहमिरखा रोहिलें, फिरगी, पठाण, अरब, सिधी।।३।।
ताकपिर थोरात पांढरे स्वामीपदी सादर।
धुळप यांचा टोपी काढुन करिती आदर।।
श्रीमंतांचे प्रतिबिंब अली बहाद्दर, समशेर बहाद्दर।
कुशाबा हैबतसिंग सजेले काय रुप सुंदर।।
सातारकर पोतनीस मुख्य चिटणीस लेखक नादर।
छत्रपतीस विनवुनी देविती श्रीमंतास चादर।।
निलकंठराव धारकरी। संनिध त्याची चाकरी।
मोहिमा हैबतराव करी।।
बाबुराव सखाराम हरि शत्रु वीरांचे क्षुधी।
आहकारी मल्हारराव जगजीवन नसे परवुधी।।४।।
धन्य प्रभु पेशवे ज्याचे ऐश्वर्य बघुन मन रिझे।
परशत्रुंचे शौर्य ठाईच्या ठाई प्रसंगी थिजे।।
सुखी लोक मुलखात केशरी भात घरोघरी शिजे।
गृहस्थ भिक्षुकांचे गौरवे तुपात मनगट भिजे।।
तीर्थोतीर्थी नित्य शेरभर सोने सकाळी झीजें।
नाही दुःख कोणास पलगी आनंदात जन निजें।।
ईश्वरी असे हे धनी। महापराक्रमी साधनी।
सर्वत्र सगुण शोधुनि।।
गगु हैबत म्हणे जयाचे विघ्न गजानन वधीं।
महादेव गुणीं 'प्रभाकर' कवन शर्करा दुधी।।५।।
- शाहीर प्रभाकर
©श्रेयस पाटील