पुणे! सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर! चारी बाजुंनी पर्वतरांगा आणि मुळा मुठा नदींच्या तीरावर वसलेलं एक वैशिष्ट्यपूर्ण शहर! आजही कुणाही व्यक्तीला सहज आकर्षित करेल असं शहर! 'आम्ही पुणेकर', ही म्हणजे फार अभिमानास्पद गोष्ट बरं!
या शहराला वाढवलं कसं, तर ते वेगवेगळ्या पेठा वसवुन! पुण्याच्या पेठा! आजही जगभरात ह्या पेठा एकदम हटके आहेत. पुणे मुळात या पेठांमुळेच प्रसिद्ध आहे. आज आपण पेशवाईत या 'पुणेरी पेठांची' निर्मिती कशी झाली हे पाहुया. पण त्यासाठी आपण एक गोष्ट ध्यानात ठेवुया की, पेशवे येण्या आधी जेव्हा शिवाजी महाराजांनी, माँसाहेबांनी पुण्याच्या रुक्ष भुमीवर सोन्याचा नांगर फिरवुन पुणे गाव वसवायला सुरुवात केली, तेव्हाही त्यांनी व्यवसाय वृद्धीसाठी कसबा पेठ, मलकापूर पेठ, शहापूर पेठ, अस्तलपूर पेठ वसविली होती. यातील कसबा पेठ म्हणजे मुख्य पुणे गाव. कसबा पेठेच्या निर्मिती नंतर तिथे माँ साहेबांनी स्वतः गणपती मंदिराची स्थापना केली. तोच पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपती! त्यानंतर श्री महादेवाच्या आणि आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने तसेच या गजाननाच्या साक्षीने शिवाजीराजांच्या हातुन स्वराज्य निर्माण होऊ लागले. पुढे ते वाढत गेलं, पुण्यातही भरपूर बदल होत गेले, आणि शेवट छत्रपती शाहु महाराजांनी बाजीराव पेशव्यांना पुणे शहर इनाम दिले.
पुणे शहर बाजीरावांना इनाम मिळाल्यावर पेशव्यांनी पुण्याचं सर्वच बाबींना पोषक असं वातावरण पाहुन पुण्यातच राहायचं, आणि पुण्यातूनच पेशवे पदाचा कारभार चालवायचं ठरवलं. त्या नंतर त्यांनी पुण्यात स्वतःच्या वास्तव्यासाठी पुण्यातील मुख्य कसबा पेठेत एक दुमजली वाडा बांधला आणि या वाड्याचे 'शनिवारवाडा' असं नामकरण केले. हा नामकरण सोहळा १७३२ साली रथसप्तमीच्या दिवशी झाला आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आपल्या संपुर्ण परिवारासह पुण्यात या वाड्यात राहायला आले. त्याचा आधी दोन वर्ष म्हणजे १७३० सालीच पेशवे दफ़्तर सातारहून पुण्यात हलविले होते. त्यामुळे हे शहर राजकीय दृष्ट्याही फार महत्वपुर्ण झाले. कसबा पेठेतील शनिवारवाड्यात राहायला आल्यावर पेशव्यांनी वाड्याच्या आजुबाजुच्या परिसराचा विकास करणे सुरु केले. या कसबा पेठेच्या सुशोभित करण्याची जवाबदारी पेशव्यांनी सदाशिव दिक्षित पटवर्धन यांच्यावर सोपविली. त्यांनीही पेशव्यांच्या वाड्याचा परिसर शोभावा, अशी ती पेठ नव्याने वसवली. हे काम तब्बल सहा वर्षे चालले. पेशवे पुण्यात राहायला आल्यामुळे पुण्याचं एक वेगळं महत्व हिंदुस्तानात निर्माण झालं आणि त्यामुळे पुण्यात गर्दी वाढु लागली. यामुळे पेशव्यांनी पुण्यात सतत खडी फौज राहावी या हेतूने १७३४ साली शुक्रवार पेठेची निर्मिती केली आणि तीत लष्कराच्या छावण्यांना परवानगी देऊन पुण्यात लष्कराची कायमस्वरूपी सोय करून दिली. पुढेही व्यापार वाढवा या हेतूने पेशव्यांनी आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत १७४० साली जुनी मलकापूर पेठ नव्याने वसवुन तिचे रविवार पेठ म्हणुन नामकरण केले. खासगीवाले यांच्यासोबतच पुण्यातील इतरही सावकारांना वेगवेगळ्या पेठा वसविण्याची जवाबदारी दिली आणि बाजीराव पेशव्यांनी आपल्या काळात कसबा, रविवार, सोमवार, मंगळवार आणि शनिवार पेठ अशा पाच पेठांची निर्मिती केली. थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत पुण्याची लोकसंख्या वाढून ती तीस हजारांच्या घरात पोहोचली होती.
पुढे १७५९ साली नानासाहेब पेशवे यांनीही आपल्या वडीलांप्रमाणेच पुण्याचा विकास सुरु ठेवला. सर्वात प्रथम प्राधान्य त्यांनी पुण्याच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला दिला आणि पुण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यासाठी त्यांनी पुण्याच्या बाहेर कात्रज येथे मोठा तलाव बांधला. तिथुन खापरी नळांद्वारे पाणी पुर्ण पुण्यात, शनिवारवाड्यात फिरविले. जागोजागी मुख्य ठिकाणी मोठे हौद बांधले. त्यांना कला हौद, फडके हौद, गणेश हौद, बदामी हौद, शुक्रवार हौद, अशी नावे दिली आणि त्यात या नळांद्वारे आणलेलं पाणी सोडलं. त्यामुळे भरपूर पाणी पुण्याला उपलब्ध झाले. हे काम तब्बल आठ वर्षांनी संपले.
पुण्यातील आपल्या निवास स्थानालाही एक कोट बांधुन त्याला एखाद्या भव्य राजवाड्याचे स्वरूप प्राप्त करून दिले. पर्वतीचेही काम सुरु होतेच. १७४८ साली त्यांनी शुक्रवार पेठेचा आणखी विस्तार केला. त्यानंतर त्यांनी जिवाजीपंत खासगीवाले यांना व्यापाऱ्यांची पुण्यात होत असलेली वाढ पाहुन एकदम पाच पेठा वसवण्यास सांगितल्या आणि त्या पेठांचे गुरुवार पेठ, गंजपेठ, मजफर पेठ, न्याहाल पेठ असे नामकरण केले आणि त्या पेठांमध्ये व्यापाऱ्यांना आपले व्यवहार सुरु करण्यास सांगितले. १७५१ साली पेशव्यांनी आपल्या चुलत बंधु, सदाशिवराव भाऊ यांच्या नावे पेठ वसविली. हीच ती सुप्रसिद्ध सदाशिव पेठ!
व्यापार वाढीच्या दृष्टीने पेशव्यांनी अनेक पाऊले उचलली. त्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला तो म्हणजे जकात माफीचा! तब्बल सात वर्षे पुण्यात व्यापाऱ्यांना जकात माफ केला होता आणि याचा फायदा असा झाला की, पुण्यातील व्यापाऱ्यांची उलाढाल वाढण्यासोबतच बाहेरूनही अजुन व्यापारी पुण्यात येऊ लागले आणि पुणे शहर गजबजून गेले. पुढे १७५५ साली आपले आराध्य श्री गजाननाच्या नावे त्यांनी गणेश पेठ वसविली. त्यानंतर काही महिन्यात नानासाहेबांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव नारायण असे ठेवण्यात आले. पुत्रप्राप्तीच्या आनंदात नानासाहेबांनी सदाशिव पेठेच्या शेजारीच नवीन पेठ वसवली आणि तिला आपल्या पुत्राचा नाव दिलं, नारायण पेठ! पुढे नानासाहेबांनी नाना फडणवीसांस आदेश देऊन पाण्याचे खापरी नळ काढुन दगडी नळ घातले. त्यानंतर नाना फडणवीसांनी सदाशिवपेठ आणि नारायण पेठेतही हौद आणि दगडी नळ बांधुन पाणी फिरवले.व्यापाऱ्यांच्या वृद्धीनंतर नगरवासीयांना राहत यावे यासाठी नानासाहेबांनी गोसावीपुरा, मेहुणपुरा, कामठपुरा हे तीन पुरे वसविली आणि त्यात लोकवस्ती वाढविली. फौजेतील लोकांना वस्तीसाठी लष्करीतळा जवळच परवानगी दिली. शुक्रवार पेठेत बावनखणी बांधुन कलावंतांनाही आसरा दिला.
पुणे शहर हे मुघली थाटाचे, दिल्लीच्या तोडीचे करायचे, असं नानासाहेबांनी ठरवलं होतं. त्यादृष्टीने अनेक बदल नानासाहेबांनी घडवले. पुण्याचा विकास केला कायापालट केला. पुण्याचा खरा विस्तार नानासाहेब पेशव्यांच्या काळातच झाला. तीस हजाराहून लोकवस्ती पन्नास हजारांवर पोहोचली. पुढे पानिपतच्या अपयशाने नानासाहेब खचले आणि पुण्याच्या विस्ताराला खीळ बसली. तरीही पुण्याच्या विकासाचा खरा प्रणेता नानासाहेब पेशवेच ठरतात. कवि अनंततनय याचे वर्णन करतो,
धनी शिकंदर, विलास सुंदर, राज्यधुरंधर नानांनी,
पुण्यग्रामा रूपा आणुनि, केली आपुली नृपधानी!
श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या मृत्युने पुण्याचा विकास जरी खुंटला, तरी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी सर्व दुःख बाजुला सारून तडफदार मोहिमांसोबतच पुन्हा पुण्याच्या विकासाला गति दिली. त्यांच्यापासुन पुढच्या पेशव्यांचे पुण्याच्या विकासातील योगदान पुढच्या भागात पाहुया.
- © श्रेयस पाटील