शेवटचे बाजीराव पेशवे हे राघोबादादांचे चिरंजीव होते. आपल्या वडीलांप्रमाणेच राजकीय कर्तव्यापेक्षा ते त्यांच्यातील दुर्गुणांमुळेच जास्त प्रसिद्ध आहेत. उभ्या हिंदुस्तानात पेशवाई आपल्या दैदिप्यमान कर्तृत्वाच्या जोरावर प्रसिद्ध होती. मात्र शेवटच्या बाजीराव पेशव्यांचे आयुष्य राजकीय कारभारापेक्षा ऐयाशीतच जास्त गेले.
भले मोठे वाडे बांधुन तिथे खासेचकरिणी, उपस्रीया यांच्याच सहवासात जास्त काळ घालवला. मोहीम, कारभार यांकडे त्यामुळे पेशव्यांचे साफ दुर्लक्ष झाले. यामुळे पेशवे पदाची काहीच भिती रयतेत राहिली नाही. शेवटच्या बाजीरावांनी औरस पुत्रप्राप्तीसाठी एकुण अकरा विवाह केले होते. त्यातील सहा विवाह पेशवे असताना केले होते. त्यांची नावे-
१. भागीरथीबाई
२. सरस्वतीबाई
३. राधाबाई
४. वाराणसीबाई
५. वेणूबाई उर्फ कुसाबाई
६. सरस्वतीबाई
इतर पाच लग्न त्यांनी पेशवाईच्या अस्तानंतर ब्रह्मावर्तास गेल्यावर केले.
पेशवे शेवटचे बाजीराव यांच्या या वागण्याला तेव्हाची, त्यांची लहानपणीची राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे. त्यांचा जन्म झाला १७७५ साली. तेव्हा जन्मापासुनच इकडे पेशवाई बारभाईंच्या हातात होती. त्यात हे राघोबादादांचे पुत्र! त्यामुळे नाना फडणवीसांनी पेशवे घराण्यातील इतर पुत्रांप्रमाणे त्यांना युद्धशिक्षण, घोडेस्वारी, संस्कृत भाषेचे धडे वगैरे गोष्टी शिकण्यापासून मुद्दामच लांब ठेवले आणि त्यांच्या भोवती मुद्दाम कुणबिनी, नाटकशाळा, नटव्या यांची ये जा वाढवली. त्यामुळे परिणामी ते राजकारणाच्या गोष्टींमध्ये तरबेज न होता त्यांना वयाच्या अगदी १३व्या वर्षी पासुनच स्त्रियांचे आकर्षण जडले. तरीही ठोसर नावाची एक व्यक्ती, ते पेशाने शिक्षक होते. त्यांनी शे. बाजीरावांना या जाळ्यातून बाहेर काढण्याचा खुप प्रयत्न केला. त्यांना हिशेबी केले. पण या स्त्रियांच्या आकर्षणातून त्यांना बाजीरावांना सोडवता आले नाही. एकवीस वर्षे सतत अपमान, दुर्लक्ष यांमुळे ते एकदम सुस्तावुन गेले होते.
पेशवे झाले. तरीही राज्यात स्वकीयांचाच चाललेला उच्छाद, याला ते निभावुन नेऊ शकले नाहीत. कर्तव्याची जाणच त्यांना नव्हती. त्यामुळे ते पेशवे होऊनही ऐषारामात वेळ घालवु लागले. कित्येक नाटकशाळा त्यांनी जवळ बाळगल्या होत्या. त्यांना मासिक पगार देऊ केले. तरीही त्यांची तहान भागेना म्हणुन अजुन अजुन स्त्रिया ते जवळ बाळगु लागले. विश्रामबाग वाडा बांधुन ते तिकडे राहु लागले. आणि इकडे थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, थोरले माधवराव पेशवे यांच्या पराक्रमाने सगळ्या हिंदुस्तानात प्रसिद्ध असलेला शनिवारवाडा, संपुर्ण हिंदुस्तानाच जिथून राजकारण चालायचं असा शनिवारवाडा शे. बाजीरावांच्या लाडक्या स्त्रियांनी भरून गेला. जवळ जवळ २००- ३०० स्त्रिया तिथे राहायला येत आणि दुपारचे भोजन झाले की तिथुन पुढे शे.बाजीराव यां स्त्रियांच्या सोबतच रममाण होत. पुढे सुरतेहून सुद्धा काही मुली त्यांनी पुण्यात आणुन ठेवल्या. विलासी जीवनातच ते पूर्ण दंग झाले. एका ठिकाणी मी असं वाचलं आहे, की शे. बाजीरावांनी एक अजब फतवा काढला. 'पुण्यातील प्रत्येकानी चार पाच लग्ने करावीत. त्यातील एक स्त्री आपल्या जवळ ठेवावी आणि उरलेल्या आमच्याकडे पाठवुन द्याव्यात. त्यांचा 'भोगदासी' म्हणुन आम्ही सांभाळ करुत. याचे जो पालन करेल, त्यांना पुणे दरबारात मानाचे पद देण्यात येईल आणि वैयक्तिक जहागिऱ्याही देण्यात येतील!' त्याचाही गैरफायदा पुण्यातील अनेक मुत्सद्दयांनी घेतला. अगदी श्रीमंतीत वाढलेल्या स्त्रिया अंगरक्षका प्रमाणे आजू बाजूला असत. विश्रामबाग वाडा बांधुन झाला शुक्रवार वाड्यातून शे. बाजीराव पेशवे तिकडे राहु लागले. मग शुक्रवार वाड्याच्या आजुबाजुला अनेक कलावंतिणींना राहण्यासाठी घरे बांधुन देण्यात आली. शुक्रवार वाडा मग या श्रीमंत स्त्रिया आणि पेशव्यांच्या एकांत साधनेसाठी वापरला जाऊ लागला. कित्येक रात्री त्यांनी इथे व्यतीत केल्या. पुढेही असंच चालु राहील. पेशवाई गेली तरीही त्यांची रंगेलपणाची तहान भागली नव्हती. वयाच्या ७६ व्या वर्षापर्यंत ते यातच रंगुन गेले होते.
दरम्यान, विश्रामबाग वाड्यात पेशवे राहायला गेल्यावर तिथे व्यंकट नरसी नावाच्या एका अत्यंत रूपवान स्त्रीचे नाच गाणे पेशव्यांसाठी सतत आयोजित केले जात. ती मूळची कर्नाटक प्रांतातील होती. गाणे आणि कथक नृत्यावर विशेष प्रभुत्व होते. तिचे मुळ नाव नरसी! कर्नाटकातच एकदा एका ठिकाणी नाचत असताना व्यंकटाध्वरी नावाच्या एका व्यक्तीने तिचा नाच पाहुन त्यातील काही चुका काढुन त्या प्रमाणशिरपणे समजावुन सांगितले. ती व्यक्ती या क्षेत्रातील फार मोठी जाणकार होती. त्यांचा 'विश्वगुणादर्श' नावाचा ग्रंथ त्या काळी प्रसिद्ध होता. त्यांना गुरू मानल्यावर नरसीने त्यांचे नाव आपल्या नावापुढे लावले आणि ती 'व्यंकट नरसी' या नावाने ओळखली जाऊ लागली. ती अत्यंत सौंदर्यवान होती. सवाई माधवरावांच्या काळात एका ताफ्यासोबत ती बावनखाणीत वास्तव्याला आली. शेवटच्या बाजीराव पेशव्यांच्या काळात ती स्वतंत्रपणे प्रसिद्धीस पावली. पुणे दरबार तिला महिन्याला २५० रुपये पगार देत. त्या बदल्यात मुख्य कार्यक्रमांच्या, सणासुदीच्या दिवशी आणि पेशव्यांना वाटेल तेव्हा तिचे नाच आयोजित केले जात. विश्रामबाग वाड्यात हिचे खुप नाच झाले. गाणे आणि कथक नृत्यात पारंगत असल्याने ती शे. बाजीराव पेशव्यांची अत्यंत प्रिय होती. विजयादशमीच्या निमित्त एकदा विश्रामबाग वाड्यात तिचा नाच आयोजित केला होता. त्या दरम्यान सलग तीन दिवस आणि अर्धी रात्र तिच्याकडून पेशव्यांनी नाच करवुन घेतला आणि तिला २६ हजार रुपये बक्षीस दिले. तेव्हा पासुन तिचा नाच गाण्याच्या मैफिली पेशव्यांसाठी सतत भरवल्या जाऊ लागल्या. तिला पुढे पेशव्यांनी वैजापूर तालुक्यातील करंजगाव हे गाव इनाम दिले होते. कोथरुडच्या जलमंदिरातही इंग्रजांसाठी शे. बाजीराव तिचा नाच आयोजित करत असत. तिचं एक वैशिष्ट्य असं होतं की, तिच्या एवढी रूपवान स्त्री बावनखाणीत नव्हतीच. त्यामुळे तिने आपल्या ताब्यात, इच्छेत असावे, असे अनेक जणांना वाटे. पेशव्यांच्या भीतीने मात्र कुणीही त्यासाठी धजावत नसे. अशी गायन आणि शास्त्रीय नृत्याचा मिलाप असलेली ही कलावंतीण पेशवाईत 'अभुतपुर्व' मानली गेली.
श्रीमंत शेवटचे बाजीराव पेशवे यांची आयुष्यातील दुसरी बाजु इथे या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या विलासी वृत्तीचा दुसऱ्या बाजूने विचार केला, तर असे लक्षात येईल की, त्यांच्या या वागण्यामुळे या स्त्री- पुरुष कलावंतांना चांगलाच वाव मिळाला. एक व्यासपीठ मिळाले. कलेची जोपासणी करता आली. शास्त्रीय गायन, नृत्याचा प्रचार प्रसार झाला. 'तमाशा' हा नृत्य प्रकार समृद्ध झाला आणि आजही महाराष्ट्राची ओळख म्हणुन तो जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक शाहीर तयार झाले. हा भाग खरंच वाखाणण्याजोगा आहे. पेशवाईत सगळ्याच गोष्टींनी महाराष्ट्र समृद्ध झाला, असं अगदी अभिमानाने म्हणु शकतो. शौर्य गाजवणे असो अथवा संपुर्ण देशातील वेगवेगळ्या कलाकारांच्या कलांची जोपासणी असो! सर्व बाबतीत पेशवाई समृद्ध ठरते. पण ब्रिटिशांच्या 'विलासी जीवन जगण्यापाई पेशव्यांनी संपुर्ण राज्य घालवले', या चुकीच्या प्रचावरच आपण लक्ष केंद्रित करुन या दुसऱ्या 'अभिमानास्पद' बाजुला स्पष्ट नाकारतो, हे पेशवाईचं दुर्दैव!
पण म्हणुन शेवटच्या बाजीरावांनी जे केलं, ते योग्य ठरत नाही, हे वेगळं सांगायला नको!
- © श्रेयस पाटील