पुण्याची कोतवाली आणि वाचासुंदर


श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी पुण्याचा भरपुर विकास केला. पुढे छत्रपती शाहु महाराजांचा मृत्यु झाल्यावर पुणे हे मराठी राज्याचे सत्ताकेंद्र बनले. त्यामुळे पुण्याची लोकसंख्या वाढु लागली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला. त्यामुळे नानासाहेबांनी १७४८ साली कोतवाल हे पद निर्माण केले आणि जिवाजीपंत खासगीवाले यांच्यावर कोतवालीची जवाबदारी सोपवली.

थोरले माधवराव पेशव्यांच्या वेळी ही पुण्याचा विकास होत गेला. पुणे प्रसिद्ध होत गेले. पुण्याचे महत्व वाढु लागले. परिणामी पुण्याची लोकसंख्या प्रचंड वाढली. १७६४ साली वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे श्रीमंत माधवरावांनी ठरवले. त्यांनी स्वतंत्र पोलीस खाते निर्माण केले. कोतवाल हे मुख्य पद! त्यांच्या हातात फौजदारी सोबतच दिवाणी अधिकारही दिले. पुण्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पाळत ठेवणे, बाजारभाव ठरवणे, जमिनींच्या खरेदी विक्रीवर नजर ठेवणे, करवसुली करणे, नवीन वजन मापांवर शिक्का मारुन देणे, लहान गुन्ह्यांचे निकाल लावणे, चोऱ्या माऱ्या, व्यभिचार, जुगार अड्डे इत्यादींवर नजर ठेवणे, अशी मुख्य कामे त्यांच्या हातात होती. सुरुवातीच्या काळात कोतवालाला पुण्यातील मुख्य पेठांमध्ये चावडी उघडुन देण्यात आली. त्याच्या हाताखाली १२४ जणांचा ताफा असे. थोरल्या माधवरावांनी कोतवालीवर देखरेखीची जवाबदारी नाना फडणवीसांना दिली होती. कोतवालासकट त्याच्या हाताखालच्या लोकांचे सालिना पगार ठरवले गेले. त्यानुसार कोतवालास २५०- ३०० रुपये, त्याच्या हाताखालील फडणीस आणि दफ़्तरदार यांस प्रत्येकी २०० रुपये, मुजुमदारास १७० रुपये, कारकुनांना १००- १२५ रुपये, नोकरांना ४० रुपये, शिपाई लोकांना ४४ रुपये, मशालजींना ५५ रुपये, हरकाम्यांना ५० रुपये आणि वतनदारांना २५ रुपये, असे पदानुसार पगार ठरवले गेले. लगेच त्याच वर्षी थोरल्या माधवरावांनी पहिला कोतवाल म्हणुन बाळाजी नारायण केतकर याची निवड केली आणि त्याला सर्व अधिकार देण्यात आले. कोतवाल झाल्या झाल्या केतकराने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. पुणे शहरात रात्री अकराच्या तोफेनंतर आणि पहाटे चारच्या तोफेपर्यंत संचारबंदी आणि प्रवेशबंदी लागु केली. त्यामुळे रात्री अकरा ते पहाटे चार पर्यंत सर्व व्यवहार बंद राहत, ये जा बंद असे. यामुळे बऱ्याच गुन्हे आटोक्यात आले. मात्र त्यांचा अधिकार शहरापुरता मर्यादित होता.

बाळाजी केतकरपासुन पुढे झालेले कोतवाल-
१. बाळाजी नारायण केतकर
२. बाबुराव राम
३. जनार्दन हरि
४. धोंडो बाबाजी
५. आनंदराव काशी वाचासुंदर
६. घाशीराम सावळदास
७. आनंदराव काशी वाचासुंदर (अखेरपर्यंत)

बारभाई कारस्थानावेळी पुण्याची कोतवाली पुर्णपणे नाना फडणवीसांच्या हातात गेली. कोतवालीवर आपला वाचक रहावा म्हणुन त्यांनी एक नवीन आखणी केली आणि त्यानुसार कोतवालाची नेमणुक मक्तेदारीवर करण्याचे ठरवले. त्याचा अवलंब करण्यात येऊ लागला. या मक्तेदारी पद्धतीनुसार पुणे शहराच्या वार्षिक उत्पन्ना एवढी रक्कम सरकारात जमा करण्यात येऊ लागली आणि उरलेली रक्कम सरसकट कोतवालाच्या झोळीत पडु लागली. त्यामुळे पगार आणि वर भरपुर पैसे कोतवाल कमाऊ लागले आणि नानांनी कोतवालाचा पगार बंद केला. या नवीन धोरणानुसार तेव्हाच्या कोतवालाला बाजूला करून त्या जागी आनंदराव काशी वाचासुंदर याला कोतवाल केले गेले. घाशीराम कोतवालानंतर सर्वात जास्त गाजलेला हाच कोतवाल. याच्याबद्दल थोडं जाणुन घेऊया.

आनंदराव काशी हा मुळचा कोकणातील पालीचा रहिवासी होता. तो देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होता. गोत्र भारद्वाज. त्याचे आडनांव वाचासुंदर असे होते! १७७६ साली त्याला नाना फडणवीसांनी खास कोतवालीसाठी कोकणातुन पुण्यात बोलावले. त्याला पुण्याच्या कोतवालीची रितसर सनद देण्यात आली. आपली 'वाचा' 'सुंदर' ठेऊन त्यानी नानांवर आपली छाप पडली. त्याच्यावर नानांची खुप मर्जी होती. पहिल्यांदा कोतवाल झाल्या झाल्या काही दिवसांपर्यंत जरा जपुन काम केले. त्याला हळूहळू कोतवालाच्या हातात असलेल्या अधिकारांची माहिती होऊ लागली. वर याला कुणाचंही नियंत्रण नाही. हे लक्षात येताच हा सुसाट सुटला. भरपुर पैसे खाऊ लागला. पुण्यात बाहेरुन कामासाठी स्त्रिया येत असत. त्यांना कामाचा परवाना कोतवालाकडून घ्यावा लागे. अशा स्त्रियांकडून तो जो आकडा ठरलेला असे 'लायसन फि' म्हणुन त्याच्या दुप्पट पैसे उकळु लागला. लोकांची कामे आडवून धरू लागला. यामुळे रयत त्रासु लागली. गरत्या स्त्रियांनाही या महाशयांनी सोडले नाही. त्यांचा तर याने नुसता छळ केला पैश्यांसाठी! त्यामुळे रयत खुपच त्रासुन गेली. त्यांनी नानांकडे वाचासुंदरच्या विरोधात तक्रार केली. पण नानांची त्याच्यावर मर्जी असल्यामुळे नानांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तो अजुनच माजला. आता तर बारीक सारीक कामांमधुनही तो पैसे उकळु लागला. रयत फार कष्टी झाली. नाना पाठीशी म्हणुन ह्याचे फावते, असे रयत बोलु लागली. हे जर श्रीमंतांच्या कानावर गेले तर आपली नाचक्की होईल, असा धुर्त विचार नानांच्या मनात आला आणि त्यांनी लगेच वाचासुंदरला कोतवाल पदावरुन काढुन टाकले. त्यानंतर त्यांनी घाशीराम सावळदास याला कोतवाल केले. पहिल्या टर्म मध्ये घाशीरामने खूप प्रामाणिकपणे काम केले. पण हा वाचासुंदर गप्प बसेल तर ना! त्याने काही दिवसांनी नानांना गुपचूप भेटुन ३० हजार रुपये नजर केले आणि कोतवाल पदाची मागणी केली. यामुळे नानांनी घाशीरामला काढुन पुन्हा वाचासुंदर या भ्रष्ट व्यक्तीला कोतवाल केले. घाशीरामला पदावरुन काढण्यासाठी नानांना वर्षभर संधी शोधत बसावं लागलं होतं. १७७८ साली ती संधी त्यांना मिळाली आणि वाचासुंदरला पुन्हा कोतवालीची सनद देण्यात आली. पदावर आल्या आल्या त्याने लगेच पदाचा आधीपेक्षा जास्त गैरवापर करणे सुरु केले. लोकांकडून कामे आडवून लाच घेऊ लागला. कर वसुली करताना अफरातफर करू लागला. अशी अनेक भ्रष्ट कामे तो करू लागला. त्यातच पुढे दोन वर्षांनी १७८० साली नानांनी त्याचे कोतवाल पद त्याच्याकडेच स्थिर केले. तो अजुन सोकावला. नानाही आपल्या विरुद्धच्या तक्रारींवर दुर्लक्ष करतात, हे समजल्यामुळे तो रयतेला खुप त्रास देऊ लागला. खुप पैसा त्याने गोळा केला. तरी नानांनी फार आधी पगार बंद केले होते, हे विसरता कामा नये! ते असते तर अजुनच पैसे झाले असते. म्हणजे पगार, त्यात अजुन वार्षिक उत्पन्नाची रक्कम सरकारात भरल्यावर वरती सुटणारी रक्कम यांना मिळे, ती रक्कम आणि अजुन त्यात भर म्हणुन लाच वगैरे घेऊन गोळा केलेली रक्कम!! इतकं त्याचाकडे झालं असतं. पण पगार बंद म्हणुन फरक पण नाही! भरपुर पैसा त्याने खाऊन खाऊन गोळा केला. हे सगळं नाना फडणवीसांच्या डोळ्यावर आलं. परत त्यांनी श्रीमंतांपुढे आपली नाचक्की नको म्हणुन वाचासुंदरला काढुन घाशीराम सावळदास याला पुन्हा कोतवाल केले. यावेळी त्याचावर अनेक निर्बंध लादण्यात आले. खर्चाचा हिशोब मागितला. त्यामुळे तो वैतागला आणि वाचासुंदरच्याच वळणावर गेला. काही वर्षांनी तोही खुप पैसे खाऊन माजला. रयतेत नुसता उच्छाद मांडला. ब्राह्मणांची हत्या त्याच्या हातून झाल्यावर श्रीमंत पेशव्यांनी त्याला कर्माची फळ म्हणुन मारुन टाकण्याचा हुकुम केला आणि त्याला यमसदनी धाडलं! त्याच्या नंतर पुन्हा वाचासुंदरला कोतवाल केलं गेलं. पण श्रीमंतांनी घाशीरामाला दिलेल्या देहांताच्या प्रायश्चित्ताने त्याचावर बरीच जरब बसली होती. त्याने तिथुन पुढे शेवटपर्यंत काम केलं, असं रियासतकार म्हणतात. तेही अगदी व्यवस्थित! 

पुण्याची कोतवालपदाची ही परंपरा खुपच वादग्रस्त राहिली. परंतु श्रीमंत सवाई माधवरावांच्या एका निर्णयामुळे पुढे कोतवालीवर चांगलीच जरब बसुन ती अजुन बदलौकिक होण्यापासून वाचली.

- © श्रेयस पाटील