श्रावण शुद्ध अष्टमी..
समर्थ सांप्रदायामध्ये या तिथीस खूप महत्व आहे. याच तिथीस समर्थ रामदासस्वामी यांना श्रीरामरायाने पहिल्यांदा दर्शन देऊन अनुग्रह दिला होता. यावर्षीच्या या तिथीचे अजून एक विशेष महत्व म्हणजे यंदा या दर्शन व अनुग्रह दिनास ४०० वर्ष पूर्ण झाली. या दर्शन व अनुग्रहाचे सुंदर वर्णन समर्थ प्रताप, हनुमंतस्वामी यांची बखर व अश्याच अनेक समर्थ चरित्रात केले आहे. ते आपणां सर्वांसाठी मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो.
शके १५२६, क्रोधी नाम संवत्सर..
सुर्याजीपंत ठोसर यांच्या वाड्यात दरवर्षीप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव सुरु झाला. अष्टमीच्या रात्री सुर्याजीपंत कीर्तन ऐकत बसले होते. तेवढ्यात एक अंगावर घोंगडी घेतलेला एक माणूस त्यांच्या समोर येऊन उभा राहिला व 'मारुतीच्या मंदिरात चला. एक महत्वाचे काम आहे', असे म्हणाला. गावचे कुलकर्णीपणाची जबाबदारी असलेले सुर्याजीपंत लगेच दौत, लेखणी वगैरे साहित्य घेऊन मारुती मंदिराकडे चालू लागले. पण तिथे गेल्यावर त्यांना मोकाशी वगैरे कुणीही दिसेना. शेवट ते मारुतीच्या मंदिरात गेले व मारुतीस साष्टांग दंडवत घातला. पंत उठतात तोच त्यांना संपूर्ण गाभारा दिव्या तेजाने भरलेला दिसला व त्यात त्यांना श्रीराम, लक्ष्मण व सीता अश्या तीन मूर्ती दिसल्या. पंतांनी भारावून जाऊन तिघांनाही साष्टांग दंडवत केला. रामरायाने त्यांना डोक्यावर हात ठेऊन त्रयोदशाक्षरी मंत्राचा अनुग्रह दिला व तुम्हांस लवकरच भक्ती, ज्ञान, वैराग्यसंपन्न दोन पुत्र होतील असा वर देऊन रामराय अंतर्धान पावले. सुर्याजीपंतांना रामरायाचा मारुतीच्या साक्षीने अनुग्रह झाला.
पुढे पंतांना पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव गंगाधर असे ठेवण्यात आले. यांनाच श्रेष्ठ, रामीरामदास इत्यादी नावांनी ओळखले जाते.
शके १५३६ साली, आनंदनाम संवत्सरी श्रेष्ठांना त्याच मारुतीरायाच्या देवळात ११ दिवस तिथेच राहून मारुती कवचाचे पठण केल्यावर रात्री मारुतीरायाच्या कृपेने फाल्गुन शुद्ध एकादशीस रामरायाचा अनुग्रह झाला. त्याबद्दलचे जास्त वर्णन चरित्रात दिले नाही. मात्र मागे दिलेल्या समर्थकृत अभंगात समर्थांनी याचे थोडक्यात वर्णन केले आहे. ते म्हणतात,
पुढे जेष्ठ बंधू न सांगेची काही।
सुखे देवालयी निद्रा केली।।
निद्रा केली तेथे श्रीराम उठावोनी।
तोचि मंत्र कानी सांगितला।।
श्रेष्ठ जन्मानंतर बरोबर दीड वर्षांनी शके १५३० साली कीलकनाम संवत्सरी, रामनवमीच्या उत्सवात रामजन्मावेळीच समर्थांचा जन्म झाला. शके १५३५ साली सुर्याजीपंतांनी नारायणाची मुंज केली. पुढे दोनच वर्षांनी शके १५३७ साली सुर्याजीपंतांनी आपला देह ठेवला. पंतांच्या निधनानंतर श्रेष्ठ गंगाधर आपल्या वाड्यात माडीवर लोकांना अनुग्रह देत.
एकदा असेच नारायण त्यांच्याकडे येऊन हट्ट करू लागला की 'दादा, मलाही अनुग्रह दे ना रे!' श्रेष्ठांनी त्यांची समजुत काढली व म्हणाले की, 'नारायणा, अजुन तुझे वय फार लहान आहे. तू मोठा झालास की देईन तुलाही अनुग्रह!' पण नारायण ऐकेल तर ना!
'नाहीस देत तू अनुग्रह तर ठिक! अनुग्रह मला आत्ताच हवा.' असे म्हणून नारायण रुसून मारुतीच्या देवालयात येऊन बसला.
हा दिवस होता श्रावण शुद्ध अष्टमी शके १५३८..!
नारायण इकडे मंदिरात एका कोपऱ्यात रुसून बसला. त्याच दिवशी मध्यरात्री नारायणासमोर श्रीरामचंद्र सगुण, अर्थात यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य या षड्गुणांसह पांचभौतिक पूर्ण शुद्धसत्वमय देहाच्या रुपात प्रकट झाले. कसे होते हो रामराया? याचे वर्णन समर्थ प्रतापमध्ये केले आहे..
श्रीरामस्वामी देखिलें चतुर्भुज।
श्रीरामस्वामी दिव्य द्विभुज।
श्रीरामस्वामी करीं धनुर्बाण तेज:पुंज।
शंखचक्रगदापद्म हस्ती।।
अंगी भूषणे शत सहस्त्र भानू।
कर्णी कुंडले लक्ष लक्ष भानू।
मस्तकी मुकुट किरीट कोटी भानू।
अनंत भानू अंगप्रभा।।
दिव्य पादुका श्रीचरणकमळी।
रमा वामांगी जनकबाळी।
भरत शत्रूघ्न शेष जवळी।
श्री हनुमान स्वामी अभिवंदिती।।
श्रीराम, लक्ष्मण व जानकी नारायणा पुढे उभी राहिली व श्री रामरायाने नारायणास त्याच्या मस्तकी हात ठेऊन त्रयोदशाक्षरी राममंत्र सांगून अनुग्रह दिला. कीर्तनांतून कीर्तनकार याचे सुंदर वर्णन करतात.
पाझर फुटला, प्रभू प्रकटला,
धावुनिया श्रीराम,
आला धावुनिया श्रीराम।।
अलिंगोनी, पोटी धरूनि,
पुसत काय तव काम,
आला धावुनिया श्रीराम।।
अनुग्रहाचा हट्ट कशाला,
'रामदास' तु, प्रिय आम्हांला,
श्रावण शुद्ध अष्टमीची वेळा,
धन्य होय तव नाम,
आला धावुनिया श्रीराम।।
नारायणास रामरायाने अनुग्रह देऊन 'रामदास' असे नाव ठेवले.
ह्या प्रसंगास यंदा ४०० वर्षे पूर्ण झाली. श्रीसमर्थांचे देवघर, ज्या मारुती मंदिरात सुर्याजीपंत, श्रेष्ठ व समर्थांना रामरायाचा अनुग्रह झाला, ते मारुती मंदिर आजही आपल्याला पाहायला मिळते. समर्थ प्रताप सह इतरही अनेक चरित्रात समर्थांच्या अनुग्रहाचा प्रसंग आला आहे. पण समर्थ प्रताप हे सर्वात जास्त विश्वसनीय मानले जाते. त्यामुळे मुख्यत्वे त्याचा आधार घेऊन एका गोष्टीच्या स्वरूपात, सोप्या शब्दात ती घटना मांडण्याचा केलेला हा प्रयत्न!
(संदर्भ: समर्थ प्रताप, हनुमंतस्वामींची बखर, आळतेकरकृत श्री समर्थ चरित्र, श्री समर्थांचा गाथा, एनसायक्लोपीडिया)
-©श्रेयस पाटील