घाशीराम सावळदास कोतवाल

श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या काळात त्यांनी पुण्याचा भरपुर विकास केला. धार्मिक स्थळांच्या उत्कर्षासोबतच त्यांनी व्यापाऱ्यांसाठी व इतरही लोकांसाठी भरपुर सुविधा पुण्यात उपलब्ध करून दिल्या. अनेक पेठा वसवुन व्यापाऱ्यांनाही त्यांनी पुण्याकडे आकर्षित केले आणि सर्व भारतात पुण्याला 'पेशव्यांचे पुणे' म्हणुन ओळखले जाऊ लागले. 


पुढे पानिपतच्या युद्धात पराभव झाल्यामुळे सर्वांगीण विकासासोबतच राजकीय विकासाचीही प्रगती खुंटली. पण त्यानंतर छत्रपती शाहु महाराजांच्या मृत्युमुळे स्वराज्याची सर्व सुत्रे नानासाहेबांच्या हातात आली आणि पुणे हे मराठी राज्याचे सत्ताकेंद्र बनले. त्यामुळे पुण्यात अजुन गर्दी वाढु लागली आणि दुरुन दुरुन लोक येऊन पुण्यात स्थायिक होऊ लागले. या मुळे पुण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आणि यावर उपाय म्हणुन नानासाहेबांनी पुण्याचे एक वेगळे 'पोलिस खाते' निर्माण केले आणि अण्णा खासगीवाल्यांकडे त्याची सूत्रे दिली. पुढे नानासाहेबांच्या मृत्युनंतर थोरल्या माधवरावांनी १७६४ साली कोतवाल हे पद निर्माण केले आणि पहिला कोतवाल म्हणुन बाळाजी नारायण केतकर याची नियुक्ती केली आणि फौजदारी सोबतच दिवाणी अधिकार त्यांच्या हाती दिले. पुढे काही वर्षांनी बारभाईंच्या राजकारणावेळी नाना फडणवीस यांनी कोतवालपद आपल्या प्रभुत्वाखाली घेतले आणि आपल्या मर्जीतील आनंदराव काशी वाचासुंदर यास आणि काही काळाने घाशीराम कोतवाल यास पुण्याचे कोतवाल केले. त्यावेळी कोतवालांना गुन्हे, चोऱ्या माऱ्या, मद्यपान, जुगाराचे अड्डे यांच्यावर देखरेख ठेवणे, या सोबतच शहरातील मुख्य ठिकाणांची, पेठांची देखरेख, शहराची स्वच्छता, रस्ते, इमारती यांची बांधणी डागडुजी आणि दस्त ऐवज नोंदणी अशी महत्वाची जवाबदारी देण्यात आली होती.

घाशीराम सावळदास! हा औरंगाबादेचा मुळ रहिवासी! अगदी आकर्षक व्यक्तिमत्व आणि निर्व्यसनी होता. बोलण्यात नेहमी गोडवा असल्याने आपले मत पटवुन देऊन समोरच्याला बाटलीत उतरून घेण्याची कला त्याला अवगत होती. १७७५ साली तो कुटुंब कबिल्यासह पुण्यात आला. आपले व्यक्तिमत्व आणि लाघवी बोलणे यांच्या जोरावर तसेच अनेक किंमती नजराणे देऊन त्यानी नाना फडणवीस यांवर आपली मर्जी संपादन केली. हा असा कोतवाल जर पुण्यास लाभला तर पुण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न मिटेल असे नानांना वाटले आणि त्यांनी सखाराम बापु बोकील यांच्या सल्ल्याने १७७७ साली घाशीरामास पहिल्यांदा कोतवाल पद बहाल केले. ह्या पहिल्या टर्म वेळी त्याने पुण्याची अगदी उत्तम व्यवस्था ठेवली होती. आपले हेरखातेही त्याने अगदी बळकट ठेवले होते. यामुळे पुण्याचा बंदोबस्त एकदम व्यवस्थित ठेवला गेला.

असे उल्लेख आढळतात की, नाना फडणवीस यांना आनंद काशीनें अनेक प्रकारचे नजराणे देऊन त्यांची मर्जी संपादन केली आणि पुन्हा कोतवाल झाला. पण अनेक अधिकार हातात आल्याने तो माजून गेला आणि रयतेवर जुलुम करु लागला. भरपुर लाच खाऊ लागला. हे नानांच्या नजरेस येताच त्यांनी १७८२ साली काशींस कोतवाल पदावरून लांब केले आणि पुन्हा घाशीराम यास कोतवाल पदाची सूत्रे दिली. या वेळी त्यास नानांनी अनेक निर्बंधात अडकवले. त्याला ५०० रुपये वार्षिक तनखा मंजुर करण्यात आला. त्यातुन नजराणा म्हणुन ११% रक्कम नाना वसुल करू लागले. वर त्यास सर्व हिशोबही द्यावा लागे. यामुळे तो वैतागला आणि आपला मुळ स्वभाव सोडुन तोही भ्रष्टाचाराकडे वळला.

घाशीरामच्या अखत्यारीत कसबा पेठ, सोमवार पेठ, गणेश, वेताळ, नारायण, शुक्रवार, रविवार, शनिवार, या पेठेतील मुख्य चावड्या होत्या. या प्रत्येक चावडीत १ कमाविसदर, १ फडणीस, १ दफ़्तरदार, ४ कारकून, ४० शिपाई, २ मशालजी, २ हरकामे, ६ वतनदार, आणि काही प्यादे असा लवाजमा असे. घाशीरामाकडे लहान गुन्ह्यांचे निकाल देणे, करवसुली, व्यभिचार, जुगार यांवर जरब बसवणे अशी अनेक लहानमोठी कामे होती. त्यातुन स्त्रीविषयक अनेक गुन्ह्यांच्या नोंदी पुण्यातील मोठमोठ्या लोकांवर आहेत, हे त्याने चांगले हेरले होते. त्यावर कडक शिस्त असे विशेषण लावुन त्याने आपला वट निर्माण केला. लहान सहान कारणांपासून मोठमोठ्या व्यवहारांपर्यंतचे अनेक अधिकार त्याचा हातात असल्याने त्यांनी त्याला अडते घालुन लोकांकडुन भरपुर लाच घेऊ लागला. त्याच दरम्यान १७८३ साली सवाई माधवराव पेशव्यांच्या लग्न समारंभावेळी उत्तम बंदोबस्त ठेऊन आणि आपल्या गुप्तहेरांमार्फत राघोबादादांचे बारीक हलचालींबद्दल माहिती काढून ती नानास देऊन त्याने नाना फडणवीसांस खुश ठेवले व त्यांची मर्जी आणि विश्वास निर्माण केला. त्यामुळे नानांनीही त्याच्या विरुद्ध रयतेतून येणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याचा अजूनच भान सुटले आणि तो रयतेवर असहाय्य जुलुम करू लागला. लाच घेऊन घेऊन बक्कळ पैसा त्याने जमवला आणि भवानी पेठेत एक वाडा बांधुन आपल्या कुटुंबासह तिथे रहायला आला. त्याच्या कुटुंबात त्याची बायको दोन मुले होती. त्यांची नावे जीवनराम आणि सखाराम. त्याची मुलगी जी म्हणवली जाते, ललितागौरी, तिचे कसलेच पुरावे उपलब्ध नाहीत. तिचा जन्मच झाला होता कि नव्हता हा अजुनही संशोधनाचा विषय बनुन आहे. आणि त्यामुळे नाना फडणवीस यांना जे तिचे नाव लाऊन स्त्रीलंपट ठरविण्याचा प्रयत्न चालु आहे, तो पूर्णपणे चुक मानला पाहिजे! त्याचेही कसले पुरावे उपलब्ध नाहीत. असो! तर आपल्या कुटुंबासह घाशीराम भवानी पेठेतील नवीन वाड्यात राहु लागला.

१७८६ साली घाशीरामाने नानांच्या माध्यमातुन सवाई माधवराव पेशव्यांकडुन आपला थोरला मुलगा जीवनराम याच्या नावे 'नवापूर पेठ' वसविण्याची परवानगी मिळवली. पुढे २ वर्षांनी, १७८८ साली, आपला धाकटा मुलगा सखाराम याच्या नावे पेठेच्या शेटेपणाची जवाबदारी मिळवली. यामुळे घाशीराम अजुनच सोकावला. त्याचा माज अजुन वाढला. त्यातच त्याला नानांनी आता त्याच्या हाताखाली १०० गारदी, २ दिवटे, १० नजरबाज, १०० स्वार अशा २१२ जणांची भरती केली. त्यामुळे त्याचा एखाद्या सरदाराप्रमाणे थाट झाला. त्याच्या थोरल्या पुत्राच्या विवाहातही नानांनी एखादा सरदार असल्याप्रमाणे त्यास हजारो रुपयांचा आहेर केला. अन्नखर्चासाठीही पैसे देऊ केले. यामुळे त्याचे भान पुर्ण सुटले. आता तर तो कसाही वागु लागला. करडा कोतवाल म्हणुन तो पुण्यात प्रसिद्ध होऊ लागला. पण शेवट बुरे दिन आलेच!!

सन १७९१ साली श्रावण मासातील देकार घेण्यासाठी रमण्यात तेलंगी ब्राह्मण आले होते. ते एकुण २७ जण होते. ते घाशीरामाच्या मळ्यात आराम करायला आले. भुक लागल्यामुळे त्यांनी मळ्यातील दहा कणसे तोडुन खाल्ली. याचा राग मनात धरुन त्या मळ्याच्या रखवालदारानी त्यांच्याबद्दल आपल्या मालकास, घाशीरामास सांगितले. हा घाशीराम लालेलाल झाला आणि तण तण करत तो मळ्यात आला. सगळेच्या सगळे ब्राह्मण त्यानी उचलले. तोवर ही बातमी पसरत पसरत सवाई माधवरावांच्या कानावर गेली होती. पेशव्यांनी लगेच त्यास निरोप धाडला की, 'ब्राह्मणांचे पारिपत्य आम्हांस न कळविता न करणे!' पण त्याने साक्षात पेशव्यांचा हुकुम धुडकावून लावला आणि सगळे ब्राह्मण त्याने आपल्या भवानी पेठेतील वाड्यातील अगदी छोट्या आकारातील अंधाऱ्या कोठडीत 'कोंबली'. एकुण ३६ तास तशा अवस्थेत ती कोंबली गेल्यामुळे २७ पैकी १८ ब्राह्मण मेले आणि ३ अत्यवस्थ झाले. ही बातमी तिथेच पाहऱ्यावर असणाऱ्या एका घाशीरामाच्या सेवकाने मानाजी फाकडे यांना गुपचूप जाऊन कळवली. हा माणूस म्हणजे अगदी शूर! एकदम क्रूर म्हणुन तो प्रसिद्धच होता. त्यांच्या कानावर घाशीरामचे अनेक किस्सेही गेलेच होते. त्यामुळे ते प्रचंड चिडले आणि पुण्याच्या रस्त्यांवरून दोन्ही हातात नांग्या तलवारी घेऊन ते बेडरपणे घाशीरामाच्या वाड्यात घुसले. घाशीराम वाड्यात नव्हता, हे त्या येड्याचं औट घटकेच नशीबच!! फाकड्यांनी ती कोठडी फोडुन त्यातील ब्राह्मण बाहेर काढले. फक्त सहा ब्राह्मण जिवंत राहिले होते २७ पैकी!

ही गोष्ट तशीच जाऊन फाकड्यांनी सवाई माधवरावांना जाऊन सांगितली. न्यायप्रिय पेशव्यांना ही गोष्ट अजिबातच रुचली नाही. ते पूर्ण संतापले. नानांची वाट न पाहता त्यांनी घाशीरामाला समोर उभं करण्याचे आदेश दिले. इकडे सगळ्या पुण्यात झालेल्या प्रकारची बातमी पसरली होती. घाशीरामाच्या आधीच्या जुलुमी वागण्याने त्रस्त झालेले ब्राह्मण त्याच्या या 'अति' करण्यामुळे पेटुन उठले आणि ते शनिवारवाड्याच्या बाहेर जमा झाले. 'श्रीमंतांनी घाशीरामास मृत्युदंडाची शिक्षा द्यावी. त्यास माफी न करणे,' असा गोंधळ सुरु केला. पेशवेही अजुन संतापले. इकडे घाशीराम नानांच्या वाड्यात लपुन बसला होता. नानांना तो म्हणे,' नाना, मी त्या ब्राह्मणांचा जीव घेतला नाही. ते चोर लूच्चे ब्राह्मण अफू खाऊन मेले. तुम्ही श्रीमंतांपुढे माझी बाजु मांडा. नाहीतर माझी काही धडगत नाही' , अशी विनवणी करत त्याने नानाचे पाय धरले. नाना शनिवार वाड्यात बाजु मांडण्यास गेले आणि श्रीमंतांपुढे उभे राहिले. तेवढ्यात श्रीमंत नानांवर गरजले, 'त्या क्रूरास लवकरात लवकर पकडुन कठोर शासन करावे.' नाना पेशव्यांचा हे खंबीर रूप पहिल्यांदाच पाहत होते. ते घाबरले आणि त्यांनी स्वार आपल्या वाड्याकडे रवाना केले.

ते कळताच घाशीराम नाना वाड्यातून बाहेर निघाला आणि प्राण वाचवण्यासाठी पळू लागला. बुधवार पेठेतील चावडीच्या अलीकडे त्यास ब्राह्मणांनी पकडून दगडांचा मारा केला आणि श्रीमंतांपुढे उभं केलं. इकडे त्याची मालमत्ताही जप्त केली गेली आणि घरातले बायका पोरे, सुना सगळ्यांना कैद केलं गेलं. श्रीमंतांनी कसलीही वाट न पाहता घाशीरामास 'धिंड काढुन डोके मेखसुखाली मारणे.' अशी शिक्षा संतापुन सुनावली. नानाही सवाई माधवरावांचं हे असं रौद्ररूप पहिल्यांदाच पाहत होते. स्वतःच्या मनानी दिलेला हा त्यांचा पहिलाच निर्णय! नानांनी लगेच शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाल सुरु केली. घाशीरामाला उंटावर उलटा बसवण्यात आला आणि चार मुख्य पेठेतुन त्याची धिंड निघाली. भवानी पेठेजवळ संतप्त ब्राह्मणांनी त्याच्यावर दगडफेक केली. त्यात घाशीराम निम्मा मेला. पुढे गरपीरावर धिंड पोहोचताच ब्राह्मणांनी त्याला उंटावरून खाली खेचले आणि त्याचे डोके दगडाने ठेचुन ठेचुन त्याला मारुन टाकले. पुढे २ दिवस त्याचे ते शरीर तसेच कुत्रा मरुन बेवारशी पडावं तसं पडलं होत, असं काही पुस्तकांमध्ये आलं आहे.


श्रीमंत नानासाहेबांनी पुण्याच्या संरक्षणासाठी कोतवाल पद निर्माण केले. पेशवे मोहिमेवर जात तेव्हा पुण्याची सगळी जवाबदारी कारभारी आणि कोतवालांवर असे. पेशव्यांच्या गैरहजेरीत अनेक गैरफायदे वाचासुंदर आणि घाशीराम यांनी घेतले. नाना फडणवीस यांच्या दुर्लक्षामुळे आणि अतिलाडामुळे सोकावलेल्या घाशीरामाने पेशव्यांच्या शिस्तप्रिय न्याय व्यवस्थेला काळीमा लावला. कायमचाच! असो!!

© श्रेयस पाटील