श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी १७२६ साली श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना पुणे गाव इनाम दिल्यावर, बाजीरावांनी आणि त्यांचे चिरंजीव श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी १७६१ सालापर्यंत पुणे गावाचे पुणे शहरात रूपांतर केले. कसबा पेठेत शनिवारवाड्याच्या बांधकामपासून सुरुवात झालेलं पुण्याचं सुशोभिकरण अनेक पेठा वसवुन त्यांनी दोघांनीही केलं.
१७२८ सालापासून सुरुवात झालेल्या ह्या कामात त्यांनी १७६१ साला पर्यंत शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ, पुन्हा नव्याने कसबा पेठ, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, गंजपेठ, मजफर गंज पेठ, न्याहाल पेठ, गणेश पेठ, सदाशिव पेठ आणि नारायण पेठ या तब्बल तेरा पेठा वसवल्या. यामुळे व्यापार वाढीस गेला. लोकांची गर्दी वाढली. त्यामुळे लोकवस्तीसाठी त्यांनी तीन पुरे वसविले. कलावंतांसाठी बावनखणी बांधली. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कात्रज येथे मोठा तलाव बांधुन दगडी नळांवाटे पाणी संपुर्ण पुण्यात फिरवले. ठिकठिकाणी हौद बांधुन त्या त्या परिसरातला पाण्याचा प्रश्न मिटवला. पर्वतीचं संस्थान झालं. हे सगळं आपण कालच्या भागात पाहिलं. आज पुढे पाहु.
पानिपताच्या पराभवाने खचुन जाऊन पुणे शहराचा मुख्य निर्माता श्रीमंत नानासाहेब पेशवे ह्यांचा पर्वतीवर मृत्यु झाला. संपुर्ण राज्य या दोन अचानक घडलेल्या घटनांनी पुर्ण खचुन गेले. अशाच वेळी या संपुर्ण राज्याची पेशवेपदाची जवाबदारी छत्रपतींनी श्रीमंत थोरले माधवराव बल्लाळ यांच्यावर सोपवली. पानिपतच्या पराभवाची जखम धुवुन काढुन आपले वडील नानासाहेब पेशवे यांचे पुण्याला एक मोठे, सुशोभित आणि आकर्षित शहर बनवण्याची दुहेरी जवाबदारी माधवरावांवर पडली. सतत अकरा वर्षे मोहिमा करुन त्यांनी सर्वच शत्रूंची दाणादाण उडवुन दिली आणि 'पेशवे' हेच हिंदुस्थानचे 'किंगमेकर' आहेत, हे संपुर्ण हिंदुस्थानला दाखवुन दिले. पेशवे पदाची एक जरब संपुर्ण हिंदुस्तानात निर्माण केली. त्याच बरोबर या व्यापातही थोरल्या माधवरावांनी पुण्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले नाही. पेशवेपदी आल्या आल्या त्यांनी खासगीवाल्यांना आदेश देऊन व्यापार वृद्धीसाठी भवानी पेठ वसवली. त्यानंतर लगेच १७६४ साली पुर्वी औरंगजेबाने आपल्या नातवाच्या स्मरणात वसविलेल्या मुहियाबाद पेठेचे नुतनीकरण करुन तिचे नाव बुधवार पेठ असे ठेवले. या पेठेत लोकवस्तीला प्राधान्य मिळावे, यासाठीचे आदेश त्यांनी गोविंद खासगीवाल्यांना दिले होते आणि परिणामी तिथे आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध झाल्या आणि बुधवार पेठेत लोकवस्ती वाढु लागली. आपल्या या पुणे शहरात रामरायाचेही अधिष्ठान मिळेल, या विचाराने थोरल्या माधवराव पेशव्यांनी नारो आप्पाजी खिरे यांना तुळशीबागेजवळ राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली. त्यानंतर पेशव्यांनी सदाशिव पेठ आणि नारायण पेठेचा विस्तार केला. तिथे जास्तीत जास्त कोकणस्थ ब्राह्मणांची वस्ती होईल, ही काळजी त्यांनी घेतली आणि परिणामी आजही हा परिसर पुण्यातील 'प्रतिष्ठित पेठा' म्हणुन नावारूपाला आल्या. कापड व्यवसायासाठी माधवरावांनी कापड पेठ वसवली आणि कापड व्यावसायिकांना अनेक सवलती दिल्या. थोरल्या माधवरावांनी आपल्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत वसवलेली शेवटची पेठ म्हणजे मुझफ्फरजंग पेठ! मुझफ्फरजंग हा निजामाचा दिवाण होता. निजमापासून मराठी राज्य वाचवण्याकामी या दिवाणाने माधवरावांना खुप मदत केली होती. त्या उपकाराची स्मृती म्हणुन त्याच्या नावे ही पेठ वसवली. ही थोरल्या माधवरावांच्या अकरा वर्षाच्या झंझावाती कारकिर्दीतील शेवटची पेठ!
श्रीमंत थोरले माधवरावांच्या थेऊर मुक्कामी झालेल्या मृत्युनंतर त्यांचे धाकटे बंधु श्रीमंत नारायणराव बल्लाळ हे पेशवे झाले. त्यांनीही आपल्या आठ महिन्यांच्या कारकिर्दीत एक खुप मोठा निर्णय घेऊन व्यापाऱ्यांचा दुवा मिळवला होता. माधवराव पेशव्यांनी वसविलेल्या कापड पेठेचा विस्तार होण्याच्या दृष्टीने त्यांनी १७७३ साली ७१ कापड व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. यामुळे या पेठेचा खूप विस्तार झाला. त्याच वर्षी नारायणरावांचा शनिवारवाड्यात खुन झाला. नारायणरावांच्या खुनानंतर पेशवाई खुप अस्थिर झाली. चार वर्षापर्यंत एखाद्या सुतकी घराप्रमाणे पुण्याची अवस्था होती. एवढं मोठं राज्य, त्याचा कारभार स्थिर करण्यात जुटलेले कारभारी मंडळी, यामुळे पुण्याचा विस्तार खुंटला होता.
पण त्यानंतर सवाई माधवराव हे पेशवे झाले आणि त्यांच्या कारभाऱ्यांनी अत्यंत हिरीरीने पुण्याच्या विकासाकडे लक्ष घातले. एकदम वाईट परिस्थिती त्या काळी मराठी साम्राज्याची झाली होती. पण त्यातूनही राज्य वाचवुन पुण्याच्या विकासातही सवाई माधवरावांनी मोलाचं योगदान दिलं. १७७६ साली त्यांच्या कारभाऱ्यांनी नारायण पेठेचा विस्तार केला. १७७८ साली सरदार आनंदराव रास्ते यांनी सवाई माधवरावांकडे पुण्यात वाडा बांधुन त्याच्या कडेने पेठ वसविण्याची परवानगी मागितली. ती पेठ भरपुर पैसा खर्च करून रास्त्यांनी वसविली. तिचे नाव रास्ता पेठ असे ठेवण्यात आले. हे पेठेचं काम १७८३ मध्ये पुर्ण झालं. पुण्याचा सततचा चालु असलेला विकास, व्यापाराला दिलेलं प्राधान्य या मुळे पुण्याची लोकसंख्या पन्नास साठ हजारांहून थेट दीड लाखाच्या घरात पोहोचली होती. त्यामुळे पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांनी पुण्याच्या वाढलेल्या हद्दीत अजुन तीन नवीन पेठा वसवुन व्यापार वृद्धी वाढीस लावावी असं ठरवलं. त्यानुसार १७८१ साली पेशव्यांच्या आज्ञेने मालोजीराव घोरपडे यांना कारभाऱ्यांनी पेठ वसवायला सांगितले. घोरपड्यांनी पेठ वसवली म्हणुन तिचे नामकरण पेशव्यांनी 'घोरपडे पेठ' असे केले. पुढे राजकारणाच्या व्यापामुळे १७८८ पर्यंत नवीन कुठलाही काम करण्यात आलं नाही. पण १७८९ साली नाना फडणवीसांनी उरलेल्या दोन पेठा वसविण्याचं काम हाती घेतलं. त्यात त्यांनी गणेश पेठेचा विस्तार केला आणि फक्त आडत व्यापाऱ्यांना ती पेठ दिली. पुण्याच्या पुर्वेस नानांनी १७८९ साली अजुन जमीन घेतली. तिथे स्वतः त्यांनी लक्ष घालुन एक पेठ वसवली आणि उदमी लोक तिथे राहु लागले. ही 'नाना पेठ'! या सर्व पेठा झाल्यावर नानांनी बुधवार पेठेत एक 'बेलबाग' तयार केली आणि तीत लक्ष्मी नारायणाचा मंदिर बांधलं. या सर्व पेठांच्या वसवण्यामुळे पुण्याची मरगळ नष्ट झाली आणि सवाई माधवरावांनी पुण्याची शान आणि मानही वाढवला. पुणे हे सत्तेचे केंद्र झाले. पुण्यातुन संपुर्ण हिंदुस्तानाचं राजकारण हाले. असा रुबाब त्याकाळी सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत निर्माण झाला. शेवटच्या बाजीराव पेशव्यांनी राज्यातील अत्यंत अस्थिर वातावरणामुळे नवीन कुठल्याही पेठा वसवल्या नाहीत. विश्रामबाग वाडा, शुक्रवार वाडा आणि बुधवार वाडा त्यांनी बांधुन घेतला. गुरुवार पेठेत दवाखाना बांधला. पण पुढे स्वकीयांचा त्रास, सरदारांमधील तणाव हे सगळं पाहुन लोक पुणे सोडुन जाऊ लागले. दीड लाखाचा पल्ला गाठलेली लोकसंख्या अवघ्या पुढच्या १० वर्षात थेट साठ हजारांवर आली.
इंग्रजांनी पुढे पुणे ताब्यात घेतले आणि पुण्याचे सर्वेसर्वा ज्यांना आपण म्हणु शकु, ज्यांनी पुण्याला इतकं प्रेमाने वाढवलं, त्या पेशव्यांनाच पुणे कायमचे सोडावे लागले. सर्वच बाजूंनी पुणे परिपुर्ण होते आणि आजही आहे. एका छोट्याश्या गावातुन पुण्याचा पेशव्यांनी खूप विकास केला. आज पुण्याची जी ओळख आहे, त्याच श्रेय श्रीमंत पेशव्यांना जात. एक खास गोष्ट म्हणजे पुण्याचा चहुबाजुंनी विकास करून, विस्तार करून नवीन पेठा पेशव्यांनी वसवल्या त्यांची नावे आजही तशीच आहेत. रविवार ते शनिवार अशी वारांची नावे पेठांना देऊन पेठांची नावाची एक वेगळीच पद्धत त्यांनी रुढ केली. एकदम कल्पक बुद्धीने पेशव्यांनी या पेठा वसविल्या. सह्याद्रीच्या कुशीतील एक छोटंसं गाव आज इतकं मोठं शहर झालं आहे. दख्खनची राणी, मराठ्यांची जननी अशी पुण्यभूमीला उपमा देताना अनंततनय यांनी पुण्याचं जे वर्णन केलं आहे, त्याने कुणाही पुणेकर नागरिकाची छाती अभिमानाने फुलुन जाईल....
शौर्यशालिना, समरखेलिना, महाराष्ट्रभू हृदयमणी,
पुण्यपुरी ही भली वसविली, दख्खनची म्हणती राणी,
भयात संजीवनी मानिनी, मर्द मराठ्यांची जननी,
सुहासिनी सद्भाग्यशालिनी लावण्याची नवखाणी!!
- © श्रेयस पाटील