राष्ट्रोद्धारक सद्गुरु श्री समर्थ रामदासस्वामींच्या वाङ्मयातील अनेक स्फुट काव्यांमधील डफगाणे नावाचे एक काव्य फार प्रसिद्ध आहे. आद्यक्षेत्र श्री चाफळ येथील रामनवमीच्या उत्सवाचे वर्णन त्यात समर्थांनी स्वतः केले आहे. ते वाचुन चाफळच्या श्रीराम मंदिरातील रामनवमी उत्सव कसा असायचा, याची यथार्थ कल्पना आपल्याला येते. मंदिराच्या बाजुच्या डोंगर रांगांपासून ते उत्सवाच्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या रामरायाच्या रथापर्यंत, कीर्तनकारांच्या कीर्तनांपासून ते लोकांच्या होणाऱ्या गर्दीपर्यंतचे वर्णन स्वतः समर्थांच्या शब्दात, तेही अवघ्या वीस ओव्यांमध्ये आपल्याला वाचायला मिळत आहे.
श्रीसमर्थांनी चाफळास श्रीरामरायाचे देवालय बांधण्याचा संकल्प केला. पण बांधकामासाठी लागणाऱ्या पैशाचा प्रश्न उत्पन्न झाला. त्यासाठी शिवाजीराजे, आनंदराव देशपांडे वगैरे अनेक शिष्यांनी मंदिरासाठी द्रव्य पाठवले होते. शिवाजीराजांनी पुण्यात गिरी गोसावी यांचे कीर्तन ऐकले. ते त्यांना फार आवडले आणि त्यांनी गोसावीबुवांना बिदागी देऊ केली. ती बुवांनी स्विकारली नाही. पण चाफळास श्रीसमर्थमाऊली रामरायाचं देवालय बांधत आहे, त्यासाठी तुम्ही त्यांना मदत करावी, अशी विनंती राजांना केली. महाराजांनी लगेच चाफळचे मामलेदार नरसोमल नाथ यांच्यामार्फत ३०० होन पाठवले, असा उल्लेख अनेक समर्थ चरित्रात येतो. त्यानुसार मंदीर उभे झाले आणि त्यात अंगापूरच्या डोहात सापडलेल्या श्रीरामरायाच्या मुर्तीची स्थापना केली. शके १५७० साली सर्वधारीनाम संवत्सरी चाफळच्या रामरायाच्या मंदिरात पहिला रामनवमी उत्सव मोठ्या थाटात पार पडला. त्याचं वर्णन या डफगाण्यात समर्थांनी केलं आहे. पाहूया..
भोंवती डोंगराचा फेर। मध्यें देवाचें शिखर।
पुढें मंडप सुंदर। नवखणांचा।।१।।
चहूंखांबांची रचना। वरत्या चोवीस कमाना।
काम कटाउ नयना। समाधान।।२।।
नाना तरु आंबेवने। दोहींकडे वृंदावने।
वृंदावनीं जगजीवने। वस्ती केली।।३।।
पुढें उभा कपीविर। पुर्वेकडे लंबोदर।
खालें दाटला दर्बार। नाना परी।।४।।
दमामे चौघडे वाजती। धडके भांड्यांचे गाजती।
फौजा भक्तांच्या साजती। ठाईं ठाईं।।५।।
माही मोर्तबे निशाणे। मेघडंब्रे सूर्यपाने।
फदिंड्या छत्र्या सुखासने। विंजणे कुंचे।।६।।
काहाळा कर्णे बुरुंग बाके। नानाध्वनी गगन झाके।
बहुत वाद्यांचे धबके। परोपरी।।७।।
टाळ मृदांगें उपांग। ब्रह्मविणे चुटक्या चंग।
तानमानें माजे रंग। हरिकथेसी।।८।।
घांटा घंटा शंख भेरी। डफडी पावें वाजंतरी।
भाट गर्जती नागरी। परोपरी।।९।।
उदंड यात्रेकरू आले। रंगी हरिदास मिळालें।
श्रोतेवक्ते कथा चाले। भगवंताची।।१०।।
नाना पुष्पमाळा तुरें। पाहों जाता भडस पुरें।
रंग स्वर्गीचा उतरे। तये ठाईं।।११।।
गंध सुगंध केशर। उदंड उधळती धुशर।
जगदांतरे हरिहरे। वस्ती केली।।१२।।
दिवट्या हिलाल चंद्रज्योति। नळे आर्डत उठती।
बाण हवाया झर्कती। गगनामध्ये।।१३।।
उदंड मनुष्यांची थाटे। दिसताती लखलखाटे।
येकमेकांसी बोभाटें। बोलाविती।।१४।।
उदंड उजळील्या दीपिका। नामघोषें करताळिका।
कितीयेक ते आइका। ऐका शब्द होती।।१५।।
क्षीरापतीची वाटणी। तेथें जाहाली दाटणी।
पैस नाही राजांगणी। दाटी जाली।।१६।।
रंगमाळा निरंजने। तेथें वस्ति केली मनें।
दिवस उगवता सुमनें। कोमाईलीं।।१७।।
रथ देवाचा वोढिला। यात्रेकरां निरोप जाला।
पुढें जायचा गल्बला। ठाईं ठाईं।।१८।।
भक्तजन म्हणती देवा। आता लोभ असो द्यावा।
धन्य सुकृताचा ठेवा। भक्ती तुझी।।१९।।
दास डोंगरीं राहातो। यात्रा देवाची पाहातो।
देव भक्तांसवें जातों। ध्यानरुपें।।२०।।
-राष्ट्रगुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी
श्री समर्थदेवांनी इतकं सुंदर वर्णन चाफळच्या रामरायाच्या जन्मोत्सवाच्या वेळेचं केलं आहे. समोर ते दृश्य उभं तर राहतेच! पण त्या सोबतच ते आपल्यालाही त्या काळात, त्या ठिकाणी घेऊन जाते. चाफळच्या पहिल्या रामनवमी उत्सवाचे अनुभव देते. 'दास डोंगरी राहातो' असे समर्थ इथे म्हणाले आहेत. त्याचं कारण असं की, समर्थ जास्त करुन डोंगरांमध्ये, वनांमध्येच राहत. काही महत्वाच्या प्रसंगी ते चाफळास येत. त्या वेळीही तिथुन जवळच असणाऱ्या रामघळीत ते राहिले असावें. असो!
ही उत्सवाची परंपरा आजही समर्थांच्या घराण्याचे वंशज, म्हणजेच समर्थांचे थोरले बंधु, श्री श्रेष्ठ गंगाधर यांचे वंशज पुढे चालवत आहेत. समर्थांच्या सांप्रदायात ह्या चाफळ क्षेत्राला पहिलं महत्व आहे. ती राजधानी मानली जातें. रामरायाचं मुख्य अधिष्ठान इथे आहे. सुंदर मंदिर उभं आहे. एकदा तरी या दाट हिरवळीत, डोंगर रांगांच्या कुशीत वसलेल्या या 'आद्यक्षेत्राला' अवश्य भेट द्या. भाग्यच! 'रामीरामदास म्हणें, अनुभवाचियें खूणें'..!!
- © श्रेयस पाटील