रुपखणी, गुणखणी, बावनखणी...!! काय आलं डोळ्यासमोर बावनखणी ऐकताच??
नाही, नाही..! चुकताय!!
बावनखणी म्हणजे 'शहर बडोदे सोडून, वरीस झाले बारा,
सखे बाई गं...' इतकंच नाहीे!!
बावनखणी म्हणजे कलेचं माहेरघर होतं.. गायन
असो वा नृत्य.. प्रत्येक कलेचं आश्रयस्थान! प्रत्येक दर्दीचं विसाव्याचं ठिकाण!!
पेशवेकाळामधलं सांस्कृतिक ठाणं!!! सणसूद असो, युद्ध असो, किंवा आणखी काही असो.. बावनखणीची रौनक
कधीच ढळली नाही. पेशवाईच्या अस्तानंतर ही तब्बल १२५ वर्षे बावनखणी रसिकांसाठी
टिकुन होती. परकीय आक्रमणांमुळे अस्त पावलेल्या
हिंदुस्थानी गायन व नृत्य कलेची उभारणी छत्रपती आणि पेशव्यांनी केली.
लहानपणापासूनच मुघली छायेत वाढत असताना शाहू महाराजांना मुघली दरबारातील
मनोरंजनाची चांगलीच ओळख झाली होती. त्यांनी कैदेत असताना मुघल सैन्यासाठी आयोजित
केले जाणारे नृत्य, गायन अगदी जवळून अनुभवले
होते. पुढे महाराष्ट्रात परत आल्यावर इथेही हिंदुस्थानी संगीत आणि नृत्याला उभारी
मिळवुन द्यायचं छत्रपतींनी ठरवले. मग उत्तरेतुन चांगले कलाकार ते पेशव्यांमार्फत
बोलवु लागले. मग त्यांना आणायला वगैरे भरपूर पैसे खर्च होतो म्हणुन मग
महाराष्ट्रातीलच मुलींना मुलांना तयार करायचे आदेश त्यांनी नानासाहेबांना सांगून
मानकर नावाच्या एका व्यक्तीस दिले आणि महाराष्ट्रातच मुला- मुलींना योग्य
प्रशिक्षण दिले जाऊ लागले. पुढे अनेक गायक नर्तकी अगदी गुरू शिष्य
परंपरेने नानासाहेबांनी तयार केले. ह्यासाठी उत्तर भारतातीलच धृपद गायन किंवा कथक, भरतनाट्यम वगैरेंसारख्या शास्त्रोक्त विषयात ते तरबेज
झाले. लोकगीते ते गात नसत!
शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर या सर्वांची
जवाबदारी नानासाहेबांवर पडली. त्यामुळे या सर्वांना एकत्र एकाच ठिकाणी राहता यावं, यासाठी 'बावनखणी' ही इमारत उभी राहिली. जिवाजी खासगीवाले यांनी शुक्रवार पेठेत ही
इमारत उभी केली. यालाच बावनखणी म्हणत. 'बावन'खणीच का? असाही प्रश्न आपल्याला पडतो. त्यासाठी दोन
वेगळ्या गोष्टी माझ्या वाचनात आल्या. एक अशी की, पूर्वीच्या
काळी भिंती आणि खांबांवरच घराच्या छपराचा बोजा असायचा. दोन समांतर भिंतींवर किंवा
रांगेत उभे केलेल्या खांबांवर आडवे 'बीम्स' टाकले जात. त्यावर काटकोनात वासे टाकले जायचे आणि मग त्यावरून चिवट्या
पसरून त्यावर माती टाकली जात आणि धाबे तयार केले जाई. आता या दोन बीम्स मधले अंतर
चार फूट ठेवले जाई आणि अश्या प्रकारे एकूण दहा फूट लांब आणि चार फूट रुंद जागेला
खण असे म्हणत. तशीच ही बावन्न खणांची इमारत असावी आणि म्हणुन 'बावनखणी' असं त्याच नाव पडलं. दुसरं असं की, त्या एकुण ५२ खोल्या होत्या आणि म्हणून त्याला बावनखणी म्हणत. पण हे मनाला
जास्त पटत नाही. त्यामुळे पहिलेच योग्य म्हणुन पुढे जाऊया.
बावनखणी पेशव्यांच्या परवानगीने कलावंतिणी, कसबीणींना भाडेतत्वावर रहायला देत. असे ३६ कलावंतिणी
आपल्या ताफ्यातील वादक, सहनर्तिकांसह इथे राहु लागले.
नानासाहेबांपासून पुण्यात एक सांस्कृतीकता, सांगीतिक वातावरण
तयार होऊ लागलं होते. ही संगीत परंपरा शेवटच्या बाजीरावांपर्यंत कायम होती. पुढे
सवाई माधवराव, शेवटचे बाजीराव यांच्या काळात बावनखणीचा
विस्तार होत गेला. चंद्री नायकीण, व्यंकट नरसी यांसारख्या
अनेक कलावंतिणी इथे तयार झाल्या. या सर्वांना राहायला आता एका इमारती ऐवजी पुर्ण
शुक्रवारात प्रत्येकीच्या वेगवेगळ्या इमारती उभे राहिल्या होत्या. या संपूर्ण
परिसरालाच बावनखणी म्हणू लागले. शास्त्रीय गायन, नृत्याची
परंपरा टिकवुन ठेवलेल्या बावनखणीनेही सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर स्वतःत थोडा
बदल करविला आणि त्यात लावणीचा शिरकाव झाला. तरीही गायन-नर्तन हीच कायम बावनखणीची
मिरास राहिली आहे.
शे. बाजीरावाने ठुमरीच्या धर्तीवर लावणी
रचण्यास होनाजीबाळाला सांगितले. त्यानेही अशा काही रचना केल्या की उत्तरेतील कथक
वगैरे नृत्याच्या धर्तीवर लावणीनेही आपला महाराष्ट्रात त्याच दमाचा जम बसवला. या
लावणी रचनांना साथ मिळाली ती कलावंतीणींच्या अदांची आणि याने बावनखणी झळाळून
निघाली. पुढे सगळेच शाहीर लावणी रचु लागले आणि लावणी ही एक शास्त्रीय बैठकच झाली.
आज महाराष्ट्रात रुजलेल्या बैठकीच्या लावणीचं श्रेय बावनखणीलाच द्यायला हवं.
म्हणुनच बावनखणी म्हणजे सांस्कृतिक ठाणंच म्हणावं लागेल! अनेकांनी या बावनखणीस
दुषणे दिली. मात्र हा संस्कृतीचा अखंड वाहणारा झरा पेशवाईच्या अस्तानंतरही १२५
वर्षे कलावंतीण आणि त्यांच्या साजिंद्यांनी गजबजून राहिला हे वैशिष्ट्य!
पुढे काही वर्षांनी, दशकांनी बावनखणी ढासळू लागली आणि कलावंत आपल्या कलेची
झलक दाखवण्यास इकडे तिकडे फिरू लागले. त्याच प्रमाणे ज्यांच्याकडे कला नव्हती
अशांनी मग बावनखणीचा आश्रय घेतला आणि कला नाही तर शरीर आहे आणि तेच त्यांचं भांडवल
झालं. अशाने 'मोरी छोडो डगरिया श्याम' पासून
'अंगी तारुण्याचा बहर' पर्यंतचा प्रवास
करून महाराष्ट्राला स्वतःचा एक सांस्कृतिक वारसा देऊन गेलेली 'बावनखणी' पुरती बदनाम झाली आणि कालांतराने लुप्त
झाली!!
- © श्रेयस पाटिल
- © श्रेयस पाटिल