श्रावण मासातील देकार

खंडेराव दाभाडे हे छत्रपती शाहू महाराजांचे सेनापती होते. त्यांची तळेगाव दाभाडे येथे जहागिरी होती. हे त्यांचं जहागिरीतील गाव! या गावात त्यांनी दर श्रावण महिन्यात ब्राह्मणांना दक्षिणा देण्याची प्रथा सुरु केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव त्र्यंबकराव दाभाडे यांनी आपल्या वडिलांनी सुरु केलेली प्रथा सुरु ठेवली. मात्र पुढे राऊस्वामींसोबत मोहिमेत डभोई इथे लढत असताना त्यांचा मृत्यू झाला आणि मग त्यांच्या घराण्याची स्थिती खालावत गेली. यामूळे उमाबाई दाभाडे यांनी ही देकाराची परंपरा १७३१ मध्ये बंद केली. 


या निर्णयामुळे सर्व ब्राह्मण अस्वस्थ झाले आणि त्यांनी थोरल्या बाजीराव साहेबांना गाठुन त्यांच्याकडे दाभाड्यांविरुद्ध तक्रार केली. ब्राह्मणांच्या म्हणण्यात तथ्य आहे, हे पाहुन १७३२ पासून त्यांनी स्वतःच पुण्यात स्वतःच्या अखत्यारीत दक्षिणा वाटणे सुरु केले. सुरुवातीला फक्त विद्वान ब्राह्मणांनाच पुण्यात हुजूरपागेत आणि कबुतरखान्यात दक्षिणा वाटण्यात येऊ लागली. ही बातमी पुढे इतकी पसरली कि काही वर्षांनी ब्राह्मणांची गर्दी वाढु लागली. म्हणुन मग ब्राह्मणांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण ब्राह्मणांना १००० रुपयांपर्यंत दक्षिणा देण्यात येऊ लागली. यामुळे वैदिक परंपरेचा प्रसार होऊ लागला आणि दर वर्षी हि गर्दी वाढत जाऊ लागली.

थोरल्या बाजीरावसाहेबांच्या मृत्यू नंतर नानासाहेबांनीही ही देकाराची प्रथा सुरु ठेवली. वैदिक विद्येचा प्रसार होत आहे, या हेतूने त्यांनी रमणबागेत दक्षिणा वाटणे सुरु केले. गर्दी दर वर्षी वाढतच होती. म्हणुन मग पूर्वी प्रमाणे हुजूरपागा, कबुतरखाना यासोबत रमणबाग आणि शनिवारवाड्याचा पुढचा चौक या चार ठिकाणी दक्षिणा वाटण्यात येऊ लागली. १७४४ साली श्रावणात या चार ठिकाणी दक्षिणा वाटत असताना खुप पाऊस झाला. सर्व व्यवस्था कोलमडली आणि गर्दी पांगवण्यासाठी स्वतः नानासाहेब पेशव्यांनी पावसात भिजत सर्व ब्राह्मणांना दक्षिणा वाटली. ही झालेली गडबड पाहुन पेशव्यांनी देकारासाठी कायमस्वरूपी कुठेतरी एक बंदिस्त वास्तू उभारावी असं मनी ठरवलं आणि खासगीवाल्यांशी बोलुन पर्वती पायथ्याला रमणा बांधण्याचं नक्की केलं. परंतु सततच्या मोहिमांमुळे हे काम १७४५ पासून १७५१ पर्यंत लांबले आणि शेवटी १७५१ साली कामाला सुरुवात होऊन १७५४ मध्ये काम पूर्ण झालं आणि एक बंदिस्त आणि सुरक्षित वास्तू ब्राह्मणांसाठी उभी राहिली. त्या वर्षी पासूनच या रमण्यात दक्षिणा देण्यात येऊ लागली. साधारण पन्नास ते साठ हजार ब्राह्मण रमण्यात जमु लागले. मग श्रावण शुद्ध पंचमी पासुन श्रावण शुद्ध सप्तमी पर्यंत रमणा चालू असे. ब्राह्मण तृतीयेपासूनच रमण्यात जमत. मग यांच्यासाठी पेशव्यांनी मूठभर धान्य, मीठ आणि १ १ नाणे देणे सुरु केले. या एक नाण्यातून भाजीपाला, चुलीचे लाकडे वगैरे आणुन स्वतः रमण्यात अन्न शिजवुन ब्राह्मण खाऊ लागले. एका वर्षी नुसते या शिध्यासाठी पेशव्यांनी १६ लाख रूपये खर्च केले. ८० हजार ब्राह्मण त्या वर्षी जमले होते! श्रावण पंचमीस स्वतः नानासाहेब मुख्य दारात आणि इतर सर्व कारभारी, पंडित वगैरे बाकी चार दारात उभे राहुन ब्राह्मणांची 'एंट्रन्स टेस्ट' घेत आणि 'पास आउट' झालेल्या पन्नास साठ हजार ब्राह्मणांना सरसकट सप्तमीस संध्याकाळी दक्षिणा देत. रमण्याच्या या दिवसात रखवाली करण्यासाठी पुरंदराहून गडकरी लोक येत असत. अशीही एक संकल्पना नानासाहेबांनी राबवली की, जे ब्राह्मण आजारपणामुळे येऊ शकले नाहीत, अशांच्या घरी स्वतः पेशव्यांचे सेवक जाऊन दक्षिणा देत. यामुळे नानासाहेबांचा आणि पर्यायाने या रमण्याच्या नावलौकिक सर्वदूर झाला. या मुळे नानासाहेबांच्या कारकिर्दीत ३० हजार रुपयांहून वार्षिक देकार १८ लाखांपर्यंत वाढला.

१७६१ साली थोरले माधवराव पेशवे झाले आणि त्यांनीही आपल्या तिर्थरूपांनी चालु ठेवलेली परंपरा पुढे सुरु ठेवली. पानिपतचा पराजय आणि नानासाहेबांचा मृत्यू यामुळे पहिली चार वर्षे १७६४ पर्यंत रमण्यांवर कमी खर्च केला गेला. १७६५ साली रमण्याला आग लागली आणि ते एक वर्ष देकार कबुतरखान्यात दिला गेला. त्यावर्षी नीट डागडुजी केली गेली आणि त्यासोबतच एक धर्मशाळा, मुदपाक खाना, पाण्याचे हौदही बांधले. रमण्यातल्या ब्राह्मणांना देवदर्शन करता यावे, म्हणुन रमण्यातच एक तटबंदीतील एका देवडीत गणपतीची स्थापना करण्यात आली. हाच 'रमणा गणपती'! १७६६ सालापासून माधवरावांनी साक्षरतेचे प्रमाण वाढावे या सद्हेतूनें फक्त साक्षर ब्राह्मणांनाच दक्षिणा वाटणे सुरु केले आणि हा एक पायंडाच पडला. मुख्य म्हणजे या मुळे राज्यातील साक्षरता वाढु लागली, हे वेगळे सांगणे न लागे!!

थोरले माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर या देकारांची घडी पेशवे घराण्यातील भाऊबंदकीमुळे २ वर्षे विस्कटली. पण तरीही नारायणरावांनी शनिवारवाड्यात १७७३ साली पन्नास हजार आणि राघोबादादांनी १७७४ साली पेशवे नसतानाही २५००० दक्षिणा वाटली, असे उल्लेख काही पुस्तकांमध्ये आढळतात.

सवाई माधवराव यांच्या काळात म्हणजे १७७५ सालापासून पुन्हा ही घडी बसली आणि ब्राह्मणांना दक्षिणा वाटप पुन्हा पहिल्या सारखे होऊ लागले. परंतु सवाई माधवरावांच्या कारकिर्दीच्या शेवटी या देकारामुळे ब्राह्मण ऐतखाऊ होऊ लागले, भ्रष्टाचार वाढु लागला. पुढे सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर शेवटचे बाजीराव यांनी हे आपल्या चाणाक्ष बुद्धीने ओळखले. पण आपण ही पद्धत बंद केली तर आपण रयतेत अप्रिय होऊ यामुळे त्यांनी ती प्रथा पुढे चालुच ठेवली. पेशवाईच्या अस्तानंतरही इंग्रजांनी या देकाराला 'दक्षिणा प्राईज' किंवा 'दक्षिणा कमिशन' अशी मऊ नावे देऊन ही प्रथा चालु ठेवली. तीही अगदी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत!!

या रमण्यातील देकारासोबतच शनिवारवाड्यातही खाशांच्या हातून काही दशग्रंथी, विद्वान ब्राह्मणांना सन्मानाने बोलवून एक हजार रुपयांपर्यंत दक्षिणा दिली जाई. राऊस्वामींच्या श्रावणातील देकार १७३६ साली चालु करण्यापासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंत या ८२ वर्षातील, आजच्या काही पुस्तकांमधले आकडे पाहून एक सरासरी रक्कम काढायची म्हणली, तर ती तब्बल ८५ लाख १६ हजार ५०० रुपये इतकी होते!! आणि ८२ वर्ष आहेत, पण वर्षातील फक्त सरासरी ३ दिवस रमणा चालु असायचा, हे विसरू नका! अजुन गम्मत पाहु.. किती दिवस एकुण ३ दिवसांनी ते पाहिलं तर फक्त २४६ दिवस भरतात. एका वर्षालाही कमी!

'२४६ दिवसात ब्राह्मणांना दक्षिणा म्हणुन वाटायला पेशव्यांनी ८५,१६,५०० रुपये खर्च केले, तेही सरासरी!! हे काही बरोबर केलं नाही पाहा, साहेब! तेही ब्राह्मणांसाठी!!!! या ऐवजी शाळा, विद्यालये काढली असती तर शैक्षणिक प्रचार झाला असता. पण फक्त ब्राह्मणांनाच यांनी दक्षिणा देऊ केली आणि इतर जातींमधील विद्वानांकडे दुर्लक्ष केलं!!' असं जर कुणी म्हणलं तर त्यांना काय उत्तर द्यायचं हे एका ठिकाणी देऊन ठेवलंय! त्यांना म्हणायचं, 'पेशव्यांनी ब्राह्मण व्यक्तींव्यतिरिक्त जी शिंदे, होळकर ही सरदार घराणी निर्माण केली. पुढे ते मोठमोठी श्रीमंत संस्थाने झाली. त्यांच्याकडे दुर्लक्ष का??' खरंच आहे.. विद्येचा प्रसार या श्रावण मासातील देकारांमुळे झाला, याकडे आजकालची 'सुपिक डोकी' सोईस्कररित्या दुर्लक्ष करतात! नेहमीप्रमाणे.. असो!!

- © श्रेयस पाटील