विद्या, उद्यम, कला, संस्कृती इथे न काही उणे,
उभ्या भारत भूषण व्हावे, असे आमुचे पुणे!
इथेच तुटली परसत्तेची पहिल्यांदा बोटे,
स्वातंत्र्याची पहाट येथे शिवनयना भेटे,
इथेच चढली अंधारावर तेजोमय तोरणे,
उभ्या भारत भूषण व्हावे, असे आमुचे पुणे!
उदया आले इथे पेशवे बाळाजी, बाजी,
इथून उत्तरेकडे दौडले उमदे रणगाजी,
रणमर्दानी इथल्या जितली असंख्य समरांगणे,
उभ्या भारत भूषण व्हावे, असे आमुचे पुणे!
पुणे! मुळा मुठा नदीच्या तिरावर वसलेलं हे गाव! स्वतः जिजाऊ माँसाहेबांनी आणि छत्रपती शिवाजीराजांनी हे गाव वसवायला सुरुवात केली. पुढे पेशवाईत या शहराचा थोरल्या बाजीराव पेशव्यांपासून सर्वांनीच सर्व बाजुंनी विस्तार केला. पेशवे हे आधुनिक पुण्याचे प्रमुख निर्माणकर्ते झाले. त्यांनी अनेक पेठा वसवल्या, पुरे वसवले. पुण्याचा भरपुर विस्तार पेशवाई काळात झाला. सर्वच क्षेत्रात पुणे शहराने आपली एक वेगळी अोळख निर्माण केली. पेशव्यांचे पुणे म्हणून ते हिंदुस्थानात प्रसिद्ध झाले. मराठा साम्राज्याची ती राजधानी झाली. 'हिंदुस्थानाचं नाक' म्हणून पुणे प्रसिद्धी पावले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहर आजही सर्वश्रूत आहे. पुण्याने आपली ही छबी अगदी आजही कायम ठेवली आहे. पेशवाईच्या सुवर्णकाळात वसवलेली पर्वती, तुळशीबाग, सारसबाग इत्यादी ठिकाणं, पेठा आजही सुप्रसिद्ध आहेत. पण या ठिकाणांचा इतिहास मात्र जास्त कुणासही माहिती नव्हता. अनेक इतिहासकारांनी तो प्रकाशात आणला. त्यांचाच आधार घेऊन, अभ्यासुन, या ब्लॉगच्या माध्यमातून तो तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ऐतिहासिक पोवाडेही इथे तुम्हाला वाचता येतील. पेशवेकालीन पुणे शहरातील इतरही अनेक अपरिचित वैशिष्ट्यांचा इथे लेखांच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक मागोवा घेतला आहे. यांसह इतरही काही विषयांवर लेख आहेत. समर्थ रामदासस्वामींच्या चरित्रातील काही घटनांवर लिहिलेले लेख इथे आहेत. त्यांचे अप्रकाशित वाङ्मयहीे सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे. इतर काही ऐतिहासिक काव्ये, पेशवाईतील प्रसिद्ध व्यक्तींची संक्षिप्त चरित्रे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि दैदिप्यमान इतिहासाची अोळख करून देणाऱ्या काही विषयांची इथे माहिती दिली आहे.
सर्व वाचकांनी हा ब्लॉग आवर्जुन वाचावा, ही विनंती.
बहुत काय लिहीणे? अगत्य असु द्यावे.
राजते लेखनावधी!